डेंग्यू नियंत्रणासाठी विद्यार्थी बनले आरोग्य मित्र, सोमवारी अळी शोध व नष्ट करण्याची मोहीम  

पंढरपूर– शहरात उद्भवलेल्या  डेंग्यू सदृश्य आजारावर नियंत्रण आणण्यासाठी येथील जवळपास 25 हजार घरांचे सर्व्हेेक्षण व तपासणी करण्यासाठी येथील महाविद्यालयांमधील एक हजार विद्यार्थी नगरपरिषदेला सहकार्य करणार असून त्यांना विद्यार्थी आरोग्य मित्र म्हणून तयार केले जात आहे. येत्या सोमवारी 25 रोजी एकाच वेळी शहरातील सर्व मालमत्तांमध्ये पाणी साठ्यांची तपासणी तसेच अळी शोध व नष्ट करण्याची मोहीम हाती घेण्यात येत आहे. याबाबत शुक्रवारी नगरपरिषदेत आमदार प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यात पालिकेकडील कमी मनुष्यबळाचा विषय चर्चेत आला होता. यावर तोडगा म्हणून स्वेरी, कर्मयोगी, सिंहगड, उमा, कर्मवीर व विवेक  वर्धिनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आरोग्य मित्र म्हणून बरोबर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत त्यांना सारी माहिती दिली जाणार आहे. या महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी आजच्या बैठकीस हजेरी लावून सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.  ज्या प्रमाणे पोलीस मित्र ही संकल्पना राज्यात राबविली जात आहे त्याच धर्तीवर पंढरीत आरोग्य मित्र ही संकल्पना पुढे आणण्यात आली आहे.शहरात डेंग्यू सदृश्य आजारावर नियंत्रणासाठी धुराळणी, फवारणी केली जात आहे. तसेच दुषित पाणी साठे ही नष्ट केले जात आहेत. आजच्या बैठकीस नगराध्यक्षा साधना भोसले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर , नगरसेवक तसेच अधिकारी उपस्थित होते. 
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!