..तर मंगल कार्यालये करणार तत्काळ बंद ,कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक कारवाईचे प्रशासनाकडून संकेत

सोलापूर, : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मर्यादेपेक्षा जास्त गर्दी करणारी मंगल कार्यालये तत्काळ बंद केली जाणार आहेत. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज बैठक घेतली.
त्या बैठकीत कोरोना प्रसार रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर चर्चा झाली. आज झालेल्या चर्चेनुसार पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना अहवाल सादर केला जाणार आहे. पालकमंत्री भरणे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर येणार असून ते अंतिम निर्णय घेणार आहेत. नियोजन भवन येथे झालेल्या बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, उपायुक्त वैशाली कडूकर आदी उपस्थित होते. बैठकीत यापुर्वी लागू करण्यात आलेल्या आदेशानुसार काय कारवाई करण्यात आली याचा आढावा घेण्यात आला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी मास्क न वापरणारे, मर्यादेपेक्षा जास्त गर्दी करणारे मंगल कार्यालयांवर दंड करण्यात आल्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले की प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करा. बाजार समितीत गर्दी करणाऱ्या व्यापारी आणि व्यावसायिक यांच्यावर कारवाई करा. एसटी बस स्टेशन आणि रेल्वे स्टेशनवर गर्दी होऊ नये यासाठी उपाययोजना आधिक काटेकोर करा. अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी प्रशासनाने केलेल्या कारवाईची माहिती दिली. त्यांनी सांगितले की कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेनमुळे लवकर लक्षणे दिसतात. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसताच नागरिकांनी लवकर चाचणी करुन घ्यावी. कोरोनाची लागण झाली असल्यास तत्काळ उपचार घ्यावे, असे सांगितले.
बैठकीत मंगल कार्यालयाबरोबरच आठवडी बाजार, जनावरांचे बाजार बंद करणे, मंदिरातील भाविकांच्या संख्येवर मर्यादा आणणे, परमिट रुम, जिम्नैशिअम, बागा, अन्नछत्र मंडळ बंद ठेवणे, दुकानांच्या वेळा, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजावर निर्बंध आणावे काय आदी मुद्यांवर चर्चा झाली. बैठकीस उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, शमा ढोक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, लस समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे, गटविकास अधिकारी राहुल देसाई, प्राथमिक शिक्षण अधिकारी संजय राठोड, उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे यांच्यासह गटविकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, आरोग्य, पोलीस, प्रादेशिक परिवहन, अन्न आणि औषध प्रशासन, सहकार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!