दादा-पंतांची जोडी आबांच्या दारी, लोकसभेच्या निमित्ताने जुन्या जाणत्यांची राजकीय वारी

पंढरपूर- सोलापूर जिल्ह्याच्या राजकारण व सहकारात अकलूजचे विजयसिंह मोहिते पाटील, पंढरपूरचे सुधाकरपंत परिचारक व सांगोल्याचे गणपतराव देशमुख यांचे मोठे योगदान आहे. या तिघांची एकत्रित ताकद जेंव्हा येथे काम करत होती तेंव्हा सर्वच संस्था प्रगतिपथावर होत्या आणि राजकारणात ही अनेक पथ्य पाळली जात होती. मात्र मागील दहा-बारा वर्षात गणित चुकू लागली. ही जुनी जाणती मंडळी ही एकमेकांपासून दुरावली आणि संस्थांचा कारभार ही डळमळला आणि राजकारण ही बिघडले. मात्र या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मोहिते पाटील व परिचारक हे भाजपाच्या व्यासपीठावर एकत्र आले व त्यांच्यातील राजकीय कटूता कमी होवून कालच मनोमिलन झाले. यानंतर आज मंगळवारी दादा व पंतांनी सांगोल्यात जावून आमदार गणपतआबांची भेट घेतली. कारण लोकसभा निवडणुकीचे असले तरी हे तीन नेते एकत्र दिसल्याचे समाधान अनेकांना झाले.
सांगोल्यात आमदार गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी ही भेट झाली यावेळी भाजपाचे माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर , माजी आमदार शहाजीबापू पाटील उपस्थित होते. गणपतराव देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाचे असून त्यांनी आजवर याच पक्षासाठी काम केले आहे. त्यांची मैत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी असून ती खूप जुनी आहे. पवार व देशमुख यांच्या मैत्रीमुळेच सांगोल्यात आबांच्या विरोधात राष्ट्रवादी उमेदवार देत नाही उलट पाठिंबाच असतो. तत्वाचे राजकारण करणार्‍या आमदार गणपतराव देशमुख यांची मैत्री पंढरीच्या सुधाकरपंत परिचारक व खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी आहे. परंतु पूर्वी जे मैत्रीचे घट्ट धागे होते ते मध्यंतरीच्या काळात सैल झाले व याचा परिणाम येथील सहकार व राजकीय क्षेत्रावर झाला. नव्या पिढीच्या राजकारणात जुन्यांचे काही चालेना अशी स्थिती झाली आणि अनेक सहकारी संस्थांची स्थिती नाजूक बनत गेली. येथील राजकारण ही बेलगाम झाले.
काही वर्षांपूर्वी जिल्हा बँक असो दूध संघ येथे पंत-दादा-आबा सांगतील तसे घडत होते. जिल्हा परिषदेत ही अशीच स्थिती होती. यामुळे या तिघांना येथील सहकार व राजकारणातील त्रिदेव म्हणून लोक ओळखत होते. जस जसे नवीन पिढी येथे कार्यरत झाली तस तशी अनेक ठिकाणी महत्वकांक्षेपोटी घडी विस्कटत गेली.
मागील दहा वर्षात तर येथील राजकारणात शह व काटशहाचा कळस झाला आहे. सहकारी संस्थांची स्थिती ही बरी नाही. सुधाकरपंत परिचारक व विजयसिंह मोहिते पाटील यांच्यात 2009 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मनभेद झाले. ते कमी होण्यासाठी दहा वर्षाचा काळ जावा लागला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार प्रशांत परिचारक यांना एकत्र आणण्याचा सफल प्रयत्न झाला. यानंतर कालच विजयदादा व सुधाकरपंत ही एकत्र आले. मंगळवारी त्यांनी सांगोल्यात जावून आमदार गणपतराव देशमुख यांची भेट घेतली. अनेक दिवसानंतर दादा- पंत- आबा एकत्र दिसले. आमदार देशमुख हे माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमदेवार संजय शिंदे यांचा जोरदार प्रचार करत आहेत. वयाची नव्वदी पार केलेल्या आबांचा आज ही उत्साह कायम असल्याचे दिसून येते. शरद पवार व देशमुखांची जुनी मैत्री असून ते पवारांसाठी व पवार त्यांच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू शकतात हे पंत व दादा ओळखून असणारच, यामुळे या बैठकीत काय घडले असेल याची कल्पना सहज येवू शकते.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!