दिलासादायक : सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढूनही रुग्णसंख्या घटतेय

पंढरपूर – सोमवार 7 जून पासून अनलॉकची प्रक्रिया सुरू असताना सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये (सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून) रविवार 6 जून रोजी आलेल्या अहवालानुसार 17 हजार 175 चाचण्यांमध्ये 457 कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. चाचणया वाढल्या असतानाही रूग्णांची संख्या कमी होत आहे ही दिलासादायक बाब असली तरी नागरिकांनी कोरोनाला रोखणारे सर्व ते उपाय करणे आवश्यक आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मोठ्या प्रमाणात रूग्ण वाढले व जीवित हानी देशभरात झाली आहे. मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळत असताना येथे ऑक्सिजनची गरज या लाटेत जाणवत होती. आता हळूहळू रूग्ण कमी होवू लागले असून एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले होते. ते आता शिथिल केले जात आहे. उद्या सोमवार 7 जून पासून सोलापूर जिल्ह्यात ही दुकाने उघडली जात आहेत.

अनलॉकची प्रक्रिया सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांकडून आलेल्या अहवालानुसार 17 हजार 175 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या असून यात 457 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. रविवारी 734 जणांनी कोरोनावर मात केली असून 21 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत. जिल्ह्यात मागील वर्षीपासून कोरोनाचे 1 लाख 26 हजार 477 रूग्ण आढळून आले आहेत. यात 2737 जणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. 1 लाख 19 हजार 848 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 3 हजार 892 रूग्ण उपचार घेत आहेत.

रविवारच्या अहवालानुसार सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये सर्वाधिक रूग्ण माळशिरस तालुक्यात 113 आढळून आले असून यापाठोपाठ बार्शीत 106तर पंढरपूर तालुक्यात 70 कोरोनाबाधित वाढले आहेत. जिल्ह्यात आजवर सर्वाधिक रूग्ण पंढरपूर तालुक्यात आढळून आले असून येथील एकूण संख्या 24 हजार 298 इतकी आहे. तर एकूण 457 जणांनी या आजारात तालुक्यात प्राण गमावले आहेत.

म्युकरमायकोसिस आजाराचे रविवारी जिल्ह्यात 6 रूग्ण आढळल्याने याची एकूण रूग्णसंख्या 401 झाली आहे. सध्या 212 जणांना उपचार सुरू आहेत तर आजवर 154 जणांनी या आजारावर मात केली आहे. म्युकरमायकोसिसमुळे जिल्ह्यात एकूण मृतांची संख्या 31 आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!