नागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरु केल्याने मुंबई- पुणे भागात लॉकडाऊन बाबतीत सवलती रद्द

मुंबई दि २१: कोरोना विषाणूंचा वाढता फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी लॉकडाऊन मध्ये आणलेली शिथिलता मुंबई- पुणे भागासाठी रद्द केली असून अधिक काटेकोरपणे लॉकडाऊन पाळले जावे असे प्रशासनाला निर्देश दिले आहेत. २० एप्रिलपासून लॉकडाऊनच्या बाबतीत काही प्रमाणात शिथिलता आणण्याचे राज्य सरकारने ठरविल्यानंतर नागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरु केले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना उद्देशून केलेल्या लाईव्ह प्रसारणातही नाराजी व्यक्त केली होती तसेच निर्बंध न पाळल्यास शिथिलता रद्द केली जाईल असा इशाराही दिला होता.

लॉकडाऊन संदर्भात राज्य शासनाने १७ एप्रिल रोजी काढलेल्या सर्वसमावेशक अधिसूचनेतील नव्याने शिथिल केलेल्या बाबी रद्द करणारी दुरुस्ती आज करण्यात आली असून मुंबई आणि पुण्यासाठी ती लागू असेल.म्हणजेच १७ एप्रिलला सुधारित अधिसूचनेपूर्वीची परिस्थिती मुंबई आणि पुण्यासाठी लागू राहील. उर्वरित राज्यात १७ एप्रिलप्रमाणे शिथिलता राहील.

ई कॉमर्स कंपन्यांना इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची वाहतूक करण्यास दिलेली शिथिलताही रद्द करण्यात आली आहे . त्यांना केवळ अन्न, जीवनावश्यक वस्तू, औषधी, आणि वैद्यकीय उपकरणे यांचीच वाहतूक करता येईल.

फरसाण, मिठाईची दुकाने, कन्फेक्शनरी दुकाने हेही मुंबई-पुण्यात पूर्वीच्या आदेशाप्रमाणे बंदच राहतील बांधकामे देखील मुंबई आणि पुण्यात बंदच राहतील तसेच या भागांतील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून वर्क फ्रॉम होम पद्धतीनेच काम करून घ्यायचे आहे

राज्यभरात वृत्तपत्रांचे वितरण करणारे विक्रेते हे मास्क, जंतू नाशक हाताला लावून तसेच सामाजिक अंतर ठेऊन वृत्तपत्रे घरोघर देऊ शकतील मात्र मुंबई आणि पुणे पालिका क्षेत्रात तसेच कंटेनमेंट क्षेत्रात वितरण करण्यावर प्रतिबंध राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!