पंढरपूरचे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर ३१ आँगस्टपर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंदच राहणार

पंढरपूर:- कोरोना व्हायरस (कोविड—१९) चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने राज्य शासनाने दि.३१ आँगस्टपर्यंत राज्यात लॉकडाऊन वाढविला आहे. राज्यातील सर्व धार्मिक स्थळे या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय झाला असल्याने पंढरपूरचे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर ३१/०८/२०२० पर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती मंदिरे समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला आहे. सोलापूर जिल्हयात व पंढरपूर शहरात देखील कोरोना रूग्ण आढळून आलेले आहेत. याचा विचार करुन मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

हा व्हायरस तीव्र संसर्गजन्य स्वरूपाचा असून महाराष्ट्र राज्यामध्ये दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तातडीने खबरदारीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याने, भाविकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर दि.१७ मार्च पासून भाविकांना दर्शनासाठी बंदच आहे.

मात्र, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर हे महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील लाखो भाविकांच्या भावनेशी संबंधित आहेत. त्यामुळे श्रीचे नित्योपचार अत्यंत काटेकोरपणे, वेळच्या वेळी, हजारो वर्षाचे प्रथा व परंपरांची सांगड घालून करणे आवश्यक आहे. कामातील त्रुटींमुळे भाविकांच्या श्रध्देला तडा जाणार नाही यासाठी पुरेपर दक्षता घेणे आवश्यक आहे. तसेच वारकरी सांप्रदयाचे श्रींच्या नित्योपचारांबरोबर अन्य प्रथा परंपंरा यावर कटाक्षाने लक्ष्य असते ही बाब विचारात घेता, पहाटे होणारी श्रीची काकडा आरती, नित्यपूजा, महानैवेद्य, पोशाख, धुपारती व शेजारती इथेपर्यंतचे सर्व उपचार पूजा परंपरेनुसार जो पूजोपचार बजावण्यात येत आहे. त्याच्या स्वरूपात किंवा तिच्या पध्दतीत कोणत्याही प्रकारचे खंड न पाडता किंवा व्यत्यय न आणता मंदिरात नित्य म्हणजेच दैनंदिन पूजोपचार चालू ठेवण्यात येत आहेत. तसेच इतर सणवार, उत्सव परंपरेनुसार साध्या पध्दतीने साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे.

सदरचे पत्रक श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरचे सदस्य आ.रामचंद्र कदम, श्रीमती. शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम. श्री. भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा, श्री. संभाजी शिंदे, आ. सुजितसिंह ठाकूर, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), ॲड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ. श्री. भागवतभुषण अतुलशास्त्री भगरे गुरूजी, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, सौ. साधना भोसले यांच्याशी विचारविनियम करून एकमताने निर्णय घेतल्यानंतर मा.सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी श्री.विठ्ठल जोशी यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!