पंढरपूर तालुकाः कोरोना मृत्यूदर 2.08% तर  रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 70 टक्के

पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण पंढरपूर तालुक्यात सापडले असले तरी येथे या आजारामुळे मृत्यूचे प्रमाण 2.08 टक्के आहे. जो अन्य तालुक्यांच्या तुलनेत कमी आहे. येथे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 70 टक्के आहे.
जिल्हा ग्रामीणमध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणार्‍यांची एकूण संख्या 419 इतकी असून 8 सप्टेंबरपर्यंत 14522 एकूण रूग्ण संख्या होती. यामुळे जिल्ह्याचा मृत्यूदर हा सरासरी 2.88 टक्के आहे. सर्वाधिक मृत्यूदर अक्कलकोट तालुक्याचा असून येथे 737 एकूण रूग्णसंख्या असून यातील 37 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. येथील मृत्यूदर हा 5 टक्के आहे. यापाठोपाठ बार्शी तालुक्याचा क्रमांक असून येथे 2759 एकूण रूग्णसंख्या असून 106 जण कोरोनामुळे मरण पावले आहेत. या तालुक्याचा कोरोना मृत्यूदर 3.84 टक्के आहे. माढा तालुक्यात 1303 रूग्ण आढळले असून तेेथे 44 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. या तालुक्याचा कोरोना मृत्यूदर हा 3.37 टक्के आहे. माळशिरस तालुक्यात 1861 एकूण रूग्ण सापडले असून तेथे 38 जणांचा मृत्यू झाला आहे. येथील मृत्यूदर हा 2.04 टक्के आहे. मोहोळ तालुक्यात कोरोनामुळे 29 जणांनी प्राण गमावले असून तेथील रूग्ण संख्या 693 असून मृत्यूदर टक्केवारी 4.18 आहे.
अन्य तालुक्यात कोरोनामुळे मृत्यूदर टक्केवारी पुढील प्रमाणे करमाळा तालुका 2.51 टक्के, मंगळवेढा 2.51, सांगोला 1.14, दक्षिण सोलापूर 2.11, उत्तर सोलापूर 3.7 टक्के.
पंढरपूर तालुक्यात सध्या 919 रूग्ण उपचार घेत असून 2231 जण कोरोनामुक्त झाले आहेत. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 70 टक्के आहे. सोलापूर जिल्ह्यात ग्रामीणमध्ये एकूण 14522 रूग्ण आढळून आले आहेत यापैकी 3217 म्हणजे 22 टक्के रूग्ण एकट्या पंढरपूर तालुक्यात आहेत. तर सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेल्यांची संख्या 4420 असून यात पंढरपूर तालुक्यातील 919 जणांचा समावेश आहे. याचे प्रमाण वीस टक्के आहे.
पंढरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यात आल्या होत्या. यामुळे रूग्ण संख्या झपाट्याने वाढली आहे. सध्या ग्रामीण भागात रोज कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. ग्रामीण भागातील रूग्ण संख्या आता शहरी भागाच्या बरोबरीने येत असल्याचे चित्र आहे. आजवर पंढरपूर शहरात 1785 तर ग्रामीणमध्ये 1432 रूग्ण आढळले आहेत. सध्या शहरातील 469 तर ग्रामीणमधील 450 जणांवर उपचार सुरू आहेत. पंढरपूर शहरात 38 जणांचा मृत्यू झाला असून येथील मृत्यूदर 2.11 टक्के आहे तर ग्रामीणमध्ये 29 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत याचे प्रमाण 2.02 टक्के आहे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!