पंढरपूर पोटनिवडणुकीत चुरस : शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा शैला गोडसे यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

पंढरपूर – 252 पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुक चुरशीची होईल असे दिसत असून महाविकास आघाडीमधील प्रमुख पक्ष असणार्‍या शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शैला गोडसे यांनी येथून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून आपली उमदेवारी जनतेच्या आग्रहाखातर असल्याने आता माघार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
शुक्रवार 26 मार्च रोजी दुपारी गोडसे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांचा अर्ज दाखल करताना त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत होते. शैला गोडसे या शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षाअ असून त्यांनी मतदारसंघात मोठे काम उभे केले आहे. अनेक प्रश्‍नांवर त्यांनी आवाज उठविला आहे तसेच त्यांची आंदोलनही सतत होत असतात. 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी त्या उत्सुक होत्या मात्र ही जागा भाजपाला मिळाली व त्यांना थांबावे लागले होते. मात्र आता त्यांनी 2021 च्या या पोटनिवडणुकीत उमेदवारी दाखल करावी अशी मागणी होत होती.
त्यांनी मागील काही दिवसात पंढरपूर व मंगळवेढ्यात संपर्क कार्यालय उघडली आहेत. आता त्यांनी थेट उमेदवारीच दाखल केली आहे. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, आपण येथून उमेदवारीची मागणी शिवसेनेकडे तसेच महाविकास आघाडीकडे केली होती. काहीहीच उत्तर न आल्याने अखेर आपण जनतेच्या आग्रहास्तव या निवडणूक रिंगणात उतरण्याचा आपण निर्णय घेतला व आज उमेदवारी दाखल केली आहे. यातून आता माघार नसल्याचे सांगत त्यांनी गेली अनेक वर्षे आपण येथे काम करत असून जनतेचे समर्थन आपल्याला असल्याचे सांगितले.
दरम्यान पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत आता चांगलीच रंगत येताना दिसत आहे. महाविकास आघाडीमधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे तर कालच काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांनी काँग्रेसने ही जागा लढवावी अशी मागणी केली आहे. आता शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा शैला गोडसे यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल करत निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. दरम्यान अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला असून भालके कुटुंबात ही उमेदवारी मिळेल असे दिसते तर भाजपात ही समाधान आवताडे व आमदार प्रशांत परिचारक यांच्या नावाची चर्चा असून यात आवताडे यांचे पारडे जड मानले जात आहे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!