पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपा ताकदीनिशी उतरली पण राष्ट्रवादीला नमवू शकेल.?


पंढरपूर- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सारी ताकद पणाला लावली असून ही जागा जिंकण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थक सार्‍याच नेत्यांनी येथे प्रचारासाठी हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. येथील आमदार कै. भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी ही लढत असून सहाजिकच सहानुभूतीची लाट भालके कुुटुंबाप्रती येथे दिसत आहे. त्यातच सत्ताधारी राष्ट्रवादीनेही व्यूहरचना आखत भगीरथ भालके यांना विजयी करण्यासाठी जोर लावला आहे. दरम्यान आजवर या मतदारसंघात कधीही भाजपाला यश मिळालेले नाही.

पुनर्रचनेनंतर म्हणजे 2009 नंतर होणारी ही चौथी निवडणूक असून येथे तीनही वेळा भारत भालके हे विजयी झाले होते. तत्पूर्वीही पंढरपूर व मंगळवेढा हे स्वतंत्र मतदारसंघ असताना देखील कधीही पंढरपूर अथवा मंगळवेढ्यात भाजपा अथवा महायुतीचा आमदार झालेला नाही. 2014 व 2019 च्या मोदी लाटेत लोकसभेला या भागातून सोलापूर मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवाराला जरूर जास्त मतदान होते मात्र विधानसभेला मात्र येथे भारत भालके हे 2014 ला काँग्रेसच्या तर नंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झाले. येथील मतदार लोकसभेला पंतप्रधान मोदी यांना साथ करतो मात्र विधानसभेला तो काँग्रेसी विचारसरणीच्या पाठीशी उभा राहतो हे आजवर दिसून आले आहे. यंदा आता 2021 च्या पोटनिवडणुकीत काय होणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

भाजपाने ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी सारी ताकद पणाला लावली आहे. येथील प्रचाराची धुरा माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पक्ष निरीक्षक म्हणून माजी मंत्री बाळा भेगडे यांना पाठविण्यात आले आहे. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे रोज दौरे सुरू आहेत. आमदार प्रशांत परिचारक व समाधान आवताडे यांच्यात समन्वय साधून आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परिचारक बंधू सध्या आवताडे यांचा जोरदार प्रचार करत आहेत. भाजपाचे पंढरपूर व मंगळवेढ्यातील नेते सारी गावे पिंजून काढत आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सारखे स्टार प्रचारक येथे बोलाविण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे उमेदवार भगीरथ भालके हे पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरले आहेत मात्र त्यांना वडिलांच्या तीन निवडणुकांचा अनुभव आहे. यातच पक्षाने येथील जबाबदारी पक्षाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय शिंदे, दीपक साळुंखे , उमेश पाटील यांच्यावर दिली आहे. पक्षाचे व महाविकास आघाडीमधील अनेक नेते येथे कामाला लागले आहेत. कै. भारत भालके यांच्या निधनामुळे सहाजिकच येथे भालके कुटुंबाप्रती मतदारांमध्ये सहानुभूतीची लाट दिसते. याच बरोबर या मतदारसंघातील अनेक दिग्गजांशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे असणारे संबंध पाहता ती मंडळी भालके यांच्या विजयासाठी प्रयत्न करत आहेत.

पंंढरपूर भागाची भिस्त परिचारक गटावर असून येथे मागील दोन निवडणुकात समाधान आवताडे यांना फारशी मतं मिळालेली नाहीत. आता परिचारक हे आवताडेंच्या पाठीशी असल्याने त्यांना याचा फायदा होईल असा भाजपाचा कयास आहे. मात्र परिचारक निवडणूक रिंगणात नसल्याने मतदार ते सांगतात म्हणून आवताडेंना यांना मते देतील का? हा मोठा प्रश्‍न आहे. आवताडे गट हा मंगळवेढा भागात बलवान आहे. त्यांना पंढरपूर भागातच खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. परिचारक समर्थक सध्या आवताडे यांच्या प्रचारात गुंतले आहेत.

कै. भारत भालके यांनी तीन सलग निवडणुकांमध्ये जनसंपर्काच्या जोरावर येथे विजय मिळविला होता. आता त्यांच्या पश्‍चात मतदार त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना कितपत साथ देणारे हे येत्या काही दिवसात दिसून येईल. राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना येथे भालके यांच्या प्रचारात गुंतली आहे. महाविकास आघाडीची एकत्रित ताकद दाखविण्यासाठी ही निवडणूक महत्वाची असल्याने येथे तीनही पक्ष प्रतिष्ठा पणाला लावून काम करत आहेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!