पंढरपूर शहरातील लसीकरणाला लागली शिस्त


पंढरपूर –  मागील काही दिवस पंढरपूर शहरात नगरपरिषदेच्या वतीने सुरू असणार्‍या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत बराच गोंधळ उडत होता व अनेक ज्येष्ठांना लसच मिळत नव्हती. हे पाहता आता आदल्या दिवशीच लस मिळणार्‍यांची यादी जाहीर केली जात आहे. यामुळे अनावश्यक होणारी गर्दी टाळली जात आहे. शुक्रवारी याच पध्दतीने अरिहंत शाळेत तीनशे जणांचे लसीकरण झाले.
सध्या सर्वत्रच लस कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने गोंधळाचे वातावरण आहे. यातच लसीकरण केंद्रांवर होणारी तुफान गर्दी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढविण्याची भीती निर्माण झाली होती. पंढरपूर शहरात नगरपरिषदेच्या वतीने दोन केंद्रावर लस दिली जात होती. तेथे दुसरा डोज घेण्यासाठी 45 वर्षांवरील नागरिकांची मोठी गर्दी होत होती. अनेकजण लस मिळावी यासाठी पहाटेपासूनच येथे रांगा लावत होते. पहिला डोज घेवून पन्नास दिवसांहून अधिक दिवस लोटलेल्यांची संख्या यात जास्त होती.
कमी प्रमाणात लस व मागणी करणारे जास्त अशी अवस्था पंढरीत दिसत होती. यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाच्या मदतीने आता एक नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शहरातील ज्या नागरिकांनी पहिला डोज घेतला आहे याची माहिती या विभागाकडे आहेच. त्या नागरिकांची दुसर्‍या डोजची तारीख जवळ आल्यानंतर त्यांची नावे आदल्या दिवशीच नगरपरिषदेच्या वतीने जाहीर केली जात आहेत. तसेच संबंधित नागरिकाला ही एसएमएसद्वारे कळविले जात आहे. दुसर्‍या डोजच्या प्रतीक्षेत हजारो नागरिक असून त्यांना रोज टप्प्या टप्प्याने बोलाविले जात आहे. मनिषा नगरमधील अरिहंत शाळेत डोजची व्यवस्था करण्यात आली आहे. गुरूवार 13 मे रोजी 310 जणांच्या लसीकरणाची नावे जाहीर करण्यात आली होती. त्यांना आज शुक्रवार 14 मे रोजी लस देण्यात आली.
सकाळी नऊ वाजता 150 जणांना तर यानंतर 10.30 वाजता 160 जणांना बोलाविण्यात आले होते. येथे यादीतील नाव तपासूनच लसीकरणासाठी सोडले जात आहे. याचे नियोजन प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून गर्दी होवू नये व शिस्तीत लसीकरण व्हावे यासाठी पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त शहर पोलिसांनी ठेवला होता. मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर , अनिरुद्ध बडवे हे या लसीकरण केंद्रावर उपस्थित होते.
यापुढे अशाच पध्दतीने लसीरकरण होणार असून ज्यांना लसीचा दुसरा डोज द्यायचा आहे त्यांची नावे आदल्या दिवशीच जाहीर होतील. यामुळे गर्दी टाळणे शक्य झाले आहे. येथे कोरोनाविषयक आरोग्य नियमांचे काटेकोरपणे पालन करणे शक्य होत आहे. 

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!