पंढरीत पाच दिवस शिवपुत्र संभाजी महाराज महानाट्याचे मोफत आयोजन ; डिव्हीपी उद्योग समुहाचा पुढाकार

पंढरपूर- डिव्हीपी उद्योग समुहाच्यावतीने शिवपुत्र संभाजी महाराज या महानाट्याचे आयोजन केले असून कोरोनाकाळात प्रथमच प्रशासनाने हजारो प्रेक्षकांना हे नाट्य पाहण्याची परवानगी दिली असल्याची माहिती डिव्हीपी उद्योग समुहाचे प्रमुख तथा धाराशिव कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी दिली.
अनलॉक प्रक्रियेअंतर्गत राज्यात प्रथमच वीस हजार प्रेक्षकांना हा प्रयोग मोफत पाहण्याची संधी मिळणार आहे. येथील चंद्रभागा मैदानावर दि.२० ते २५ फेब्रुवारी या सहा दिवसात सदर नाट्याचे पाच प्रयोग होणार आहेत. छत्रपती संभाजी मालिकेमुळे घराघरात पोहोचलेले खासदार अमोल कोल्हे हे महानाट्याचे प्रमुख नायक असणार आहेत.
दरम्यान याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यास या नाट्याचे लेखक महेंद्र महाडिक, मनसेचे शॅडो सहकार मंत्री दिलीप धोत्रे, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे दीपक भोसले, वैभव जोशी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अभिजित पाटील यांनी, अनेक वर्षापासून पंढरीत वारी काळातच सर्कस, करमणुकीचे खेळ, लोकनाट्य, कृषी प्रदर्शन आदी भरत आहे. याच पध्दतीने माघी वारीच्या दरम्यान सदर महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या दैवताचा इतिहास सर्वांना प्रत्यक्ष पाहता यावा यासाठी शिवजयंतीच्या दुसर्‍या दिवसापासून सदर महानाट्य आयोजित केले आहे. पाचही दिवस नागरिकांसाठी हे नाट्य मोफत असणार आहे. प्रयोगााबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांची अधिकृत परवानगी घेण्यात आली आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून सहा फुटाचे अंतर ठेवून आसन व्यवस्था करण्यात आली असून सॅनिटायझर तसेच स्वच्छतेबाबत सर्व नियम पाळले जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू असून ऐवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच कार्यक्रम घेण्याची परवानगी देण्यात आली असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
तर महाडिक यांनी, जवळपास साडेतीनशे कलाकार असलेले हे महानाट्य आहे. यापैकी १५० स्थानिक कलाकारांना आम्ही संधी देणार असल्याचे सांगितले. या महानाट्याचे विविध ठिकाणी १९४ प्रयोग झाले असून पंढरपूर परिसरात प्रथमच याचे आयोजन करण्यात आले आहे. महानाट्यावेळी प्रेक्षकांमधून अभिनेते डॉ.अमोल कोल्हे हे फिरणार आहेत. तसेच प्रेक्षकाच्या मधूनच घोडेस्वारी व सैनिकांची दौड होणार आहे. याचा वेगळा अनुभव पहावयास मिळेल असा विश्‍वास महाडीक यांनी व्यक्त केला.
तर दिलीप धोत्रे यांनी, लहान मुला पासून वृध्दा पर्यंत सर्वांनीच या महानाट्याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन केले.
मोफत पासचे वाटप
येथील चंद्रभागा मैदानात जवळपास वीस हजार प्रेक्षकांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. सहा दिवसात पाच प्रयोग होणार असून २३ फेब्रवारी रोजी माघी एकादशी असल्याने संचारबंदी असल्याने एक दिवस प्रयोग बंद राहणार आहे. दरम्यान हे नाटक प्रेक्षकांसाठी मोफत असले तरी यासाठी पासचे वाटप केले जाणार आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात तसेच पंढरपूर येथे विविध ठिकाणी नागरिकांना पाच दिवसाचे तारेख प्रमाणे पास वाटले जाणार आहेत. तसेच अनेक ठिकाणी नाटकाचे फलक लावले जाणार असून यावर मोबाईल क्रमांक दिला जाणार आहे. सदर क्रमांकावर फोन केल्यास पास देण्याची सोय देखील केली जाणार असल्याचे अभिजीत पाटील यांनी सांगितले.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!