परिचारक गट पोटनिवडणुकीसाठी सक्रिय.. तरूण कार्यकर्त्यांच्या ओठी प्रणव यांचे नाव..निर्णय आ.प्रशांतराव घेणार !

पंढरपूर- आमदार कै. भारत भालके यांच्या निधनाने पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून यासाठी सर्वच गट तयारी करत असताना आता भाजपाचे विधानपरिषद आमदार प्रशांत परिचारक यांचे पुतणे प्रणव परिचारक यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी परिचारक गट व भाजपातील युवा कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान अत्यंत नियोजनबध्द काम करणार्‍या परिचारक गटाच्या बैठकीत उघडपणे प्रणव यांचे नाव पुढे आल्याने यामागील उद्देश सध्या विरोधक ही शोधू लागले आहेत. तर यावेळी बोलताना प्रणव यांनी निवडणूक तर पांडुरंग परिवाराने लढविलीच पाहिजे अशी तरूण कार्यकर्त्यांची इच्छा असून मात्र उमेदवार कोण असेल? याचा निर्णय आपले नेते आमदार प्रशांत परिचारक घेतील असे स्पष्ट केले.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात भाजपाच्या पदाधिकारी निवडीसाठी बैठक होती. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा मुद्दा पुढे आला असता काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रणव परिचारक यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी केली. वास्तविक पाहता यापूर्वी परिचारक गटाच्या राजकीय निर्णयाबाबत ज्या बैठका होत यास वरिष्ठ नेते उपस्थित राहत होते. पांडुरंग परिवाराचे कुटुंबप्रमुख स्व. सुधाकरपंत परिचारक हे निर्णय घेत असत. मात्र मागील वर्षी त्यांचे निधन झाले आहे. या गटाची सारी धुरा आता आमदार प्रशांत परिचारक यांच्या खांद्यावर असून ते सध्या विधीमंडळ अधिवेशनासाठी मुंबईत आहेत.
परिचारक गट सध्या भाजपाबरोबर काम करत असून 2009 पासून ते पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात विजयासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना यश मिळालेले नाही. यापूर्वी येथून आमदार प्रशांत परिचारक व स्व.सुधाकरपंत परिचारक यांनी निवडणूक लढविली मात्र यश आले नाही. आता पोटनिवडणूक होत असताना परिचारक यांची भूमिका काय असणार याकडे सार्‍यांचे लक्ष आहे. प्रशांत परिचारक हे विधानपरिषदेचे सदस्य असून त्यांची टर्म संपण्यासाठी आणखी एक वर्ष शिल्लक आहे. तर उमेश परिचारक यांनी आजवर नेहमीच पडद्यामागून आपली राजकीय भूमिका वठविली आहे. यामुळे कदाचित प्रणव परिचारक यांचे नाव घेतले जात असावे.
प्रणव परिचारक हे युवा नेतृत्व असून त्यांनी आजवर प्रत्येक निवडणुकीत काम केले आहे. तरूणांची मोठी फळी त्यांनी तयार केली आहे. सर्वांच्या हाकेला धावून जाणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचे पंढरपूर भागाबरोबरच मंगळवेढा तालुक्यातही हितचिंतक आहेत. स्वकीय व विरोधकांमध्ये त्यांच्याबद्दल नेहमीच चांगले बोलले जाते.
दरम्यान या बैठकीत बोलताना प्रणव परिचारक म्हणाले, पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघाची जागा आपण 2009 अपवादात्मक स्थितीत सोडली. यानंतर दोन वेळा आपण येथून लढलो मात्र पराभूत व्हावे लागले आहे. आपले कुटुंबप्रमुख स्व. सुधाकरपंत परिचारक यांची हार आपल्या मनात कायम सलते हे मला माहित आहे. आता पोटनिवडणूक होत असून तरूण कार्यकर्त्यांची निवडणूक लढवा अशी इच्छा आहे. आपले नेते आमदार प्रशांत परिचारक याबाबत निर्णय घेतील. कोण उमेदवार असेल ते ठरवतील मात्र निवडणूक लढविलीच पाहिजे अशी आपलीही इच्छा आहे. भाजपाने प्रशांत परिचारक यांना ताकद देवून राज्यात सत्ता असताना मोठा निधी दिला आहे ,विकासकामे मार्गी लावली आहेत.
भाजपाकडून लढण्याची नागेश भोसले यांचीही तयारी

भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढविण्याची तयारी माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनी देखील दर्शविली आहे. गेली सात वर्षे त्यांच्याकडे नगरपरिषदेची सत्ता आहे. पालिका भालके गटाच्या ताब्यात असताना त्यांनी काही नगरसेवकांना आपल्या बाजूने आणत सत्तांतर घडविले होते. त्यांच्या पत्नी साधना भोसले या नगराध्यक्षा झाल्या. यानंतर जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेत येथून परिचारक प्रणित शहर विकास आघाडीने सौ. भोसले यांनाच उमेदवारी दिली होती व त्या जनतेतून विजयी झाल्या आहेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!