पांडुरंग कारखाना १२ लाख टन ऊस गाळणार ; गतहंगामातील २०६ ₹ प्रतिटन ऊसबिल शेतकऱ्यांना दोन दिवसात देणार

एका बाजूला पंढरपूर तालुक्यात अन्य कारखान्यांनी एफआरपी थकवली म्हणून शेतकरी संघटना आंदोलन करीत असताना श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गतहंगामातील उसाला जिल्ह्यात सर्वाधिक २५०६ ₹ प्रतिटन एफआरपी दर देत २०६ रूपये प्रतिटनाचा ऊसबिल हप्ता नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची घोषणा केली आहे.

पंढरपूर – श्रीपूर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने २०२०-२१ च्या गळीत हंगामात १२ लाख मे. टन ऊस गाळपाचे उदिष्ट ठेवले आहे. या संस्थेने गत हंगामातील उसाला २३०० रूपये टन बिल आदा केले असून उर्वरित २०६ रू. प्रतिटन हप्ता दोन दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल, अशी घोषणा अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक यांनी केली.
श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम सन २०२०- २१चा बॉयलर अग्निप्रदीपन सभारंभ कारखान्याचे संस्थापक कर्मयोगी कै. सुधाकरपंत परिचारक यांचे सहकारी ज्येष्ठ ऊस उत्पादक सभासद शेतकरी श्री.लक्ष्मण सोपान डुबल (अजनसोड ) ,श्री. ज्ञानोबा राजाराम शिंदे (रांजणी), श्री. वसंत बाबूराव चव्हाण (बाभुळगाव), श्री. शिवाजी दत्तात्रय देशमुख (कासेगाव) , श्री.ज्योतीराम रामचंद्र चव्हाण (बाभुळगाव) , श्री. दादा नारायण यलमर( सुपली) ,श्री. धोंडीबा घनश्याम पाटील (आव्हे), श्री. अनंत दिगंबर राजोपाध्ये( रांजणी) , श्री. संदीपान भीमराव वाडेकर (शिरगाव) , श्री. शामराव सखाराम लोखंडे (भंडीशेगाव), श्री. सिताराम ज्ञानोबा बागल( गादेगाव), श्री. आबासहेब जयवंत गायकवाड( चि.भोसे) , कारखान्याचे चेअरमन आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते व कारखान्याचे व्हाईस चेअरमन वसंतनाना देशमुख , माजी चेअरमन दिनकरभाऊ मोरे , कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी , प्रणव परिचारक , सर्व आजी-माजी संचालक मंडळ, विविध बँकेचे अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सत्यनारायण महापूजा कारखान्याचे विद्यमान संचालक श्री. परमेश्वर गणगे व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते संपन्न झाली सदर कार्यक्रमासाठी श्रीपूर बोरगाव -महाळुंग मधील सर्व नेतेमंडळी ,प्रतिष्ठित नागरिक , ऊस उत्पादक सभासद व कामगार बंधू ,युनियन प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार परिचारक म्हणाले, येत्या १४ तारखेला कै.पंतांच्या समवेत काम केलेल्या जेष्ठ सभासदांच्या हस्ते मोळीपूजन करून कारखाना सुरु केला जाणार आहे. शासनाने १५ आँक्टोंबर पासून गळीत हंगाम सुरु करण्यात परवानगी दिली आहे. तत्पूर्वी गतहंगामातील उर्वरित एफआरपी रक्कम सभासदांना देत आहोत. यंदा पाऊसकाळ चांगला असल्याने ऊस उत्पादन जास्त आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!