पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक : ऑनलाइन प्रक्रियेतील त्रुटी तातडीने दुरुस्त करण्याची मागणी

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांचे
राज्य निवडणूक अधिका-यांना निवेदन

मुंबई दि. २२- विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदार संघाच्या ऑनलाइन निवडणुक प्रक्रियेत अनेक त्रुटी असूनही यामध्ये दुरुस्ती न करता ही प्रक्रिया राबविली जात आहे. ही बाब गंभीर असून ही प्रक्रिया तातडीने दुरुस्त करण्याची मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात दादा पाटील यांनी आज मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांच्याकडे केली आहे.
चंद्रकात दादा पाटील यांनी आज राज्याचे मुख्य निवडणुक अधिकारी बलदेव सिंह यांची भेट घेऊन त्यांना आपले निवेदन सादर केले. पुणे पदवीधर मतदार संघाची निवडणुक प्रस्तावित आहे. या निवडणुकीसाठी मतदार संघातील मतदार नोंदणीचे काम सध्या सुरु आहे. पण ऑनलाईन पध्दतीने होणा-या प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याची बाब यापूर्वीही सदर यंत्रणेस निर्दशनास आणून दिली होत. परंतु यामध्ये सुधारणा न करता त्याच पध्दतीने ही प्रक्रिया अद्यापही सुरु आहे. त्यामुळे याप्रकरणाची निवडणूक अधिका-यांनी तातडीने दखल घेण्याची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली.
चंद्रकांत पाटील यांनी निवडणुक अधिका-यांना दिलेल्या निवेदनानुसार, सर्वर सातत्याने उपलब्ध न होणे, भरलेले फॉर्म पेंडिंग राहणे, कोणत्याही कारणाविना फॉर्म फेटाळले जाण्याचे प्रमाण मोठे असून पेंडिंग फॉर्मवर त्वरित निर्णय घेण्यात यावे. तसेच जे अर्ज ऑनलाइन पद्धतीने फेटाळले जात आहेत त्यांची कारणे समजल्यास त्यात दुरुस्ती करून परत नोंदणीची संधी देता येईल. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी व सर्व जिल्ह्यांची निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नुकतीच या मतदानासाठी मतदान केंद्रांची व त्यात जोडलेल्या प्रभागांची यादी प्रस्तावित केलेली आहे. परंतु निवडणूक विहित प्रक्रियेनुसार सर्वात प्रथम मतदार यादी अद्ययावत घोषित होणे अपेक्षित असून त्यानंतर मतदान केंद्रांची यादी घोषित केली जायला पाहिजे होती. पण प्रत्यक्षात मात्र मतदार यादी घोषित न करताच ही मतदान केंद्र घोषित केली आहेत. त्याचप्रमाणे मतदान केंद्रांमध्ये किमान सोळा कि.मी. अंतराचा निकष असल्यामुळे मोठ्या संख्येने असणाऱ्या मतदारांना मतदानाला येणे अवघड होणार आहे ही बाबही त्यांच्या निर्दशनास आणून देण्यात आली आहे.

भौगोलिक विभागांचा विचार न करताच मतदान केंद्र प्रस्तावित केली गेली आहेत असे नमूद करण्यात आले आहे. उदाहरणार्थ, वडगाव शेरी येथील मतदारांसाठी भोसरी येथील राजमाता जिजाऊ विद्यालय मतदान केंद्र प्रस्तावित केले आहे. तर कोथरूड मधील छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय बालेवाडी-बाणेर पाषाण इ. दूरवरच्या भागातील मतदारांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्यक्षात बालेवाडी-बाणेर या भागात मोठ्या प्रमाणात मतदारांनी नोंदणी केलेली असून त्या भागात वेगळे मतदान केंद्र हे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी. उपयोगी पडेल. तसेच याच प्रकारच्या मतदान केंद्रात बाबतच्या तक्रारी अन्य चारही जिल्ह्यातून प्राप्त झालेल्या आहेत. मतदान सुशिक्षित केंद्र जवळच्या अंतरावर असल्यास अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील. त्यामुळे १५ कि.मी. अंतराचा निकष बदलून ५ ते ६ कि.मी. अंतराचा निकष ठरविण्यात यावा व या मतदानासाठी मतदान केंद्रांची व्यवस्था केली जावी, अशी मागणीही दादा पाटील यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
मतदार यादी घोषित न करता मतदान केंद्र प्रस्तावित करणे, मतदान केंद्राला दूरचे भाग जोडले जाणे व यातून मतदानाची टक्केवारी कमी होऊन अनेक मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहतील. त्यामुळे ही बाब ध्यानात ठेऊन मतदारांना मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी सुकर कार्यपद्धती अवलंबणे आवश्यक आहे. तसेच ऑनलाइन प्रक्रियेद्वारे जर अर्ज भरण्यास अडचणी येत असतील तर ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास मान्यता दिली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!