पोलिसांच्या सहनशीलतेची कसोटी, संचारबंदीत फिरणार्‍यांना बुक्का लावून त्यांच्यासमोर अभंग गायन

पंढरपूर – कोरोनाशी लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसाचे लॉकडॉऊन जाहीर केले. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी घरात राहणे अपेक्षित आहे. पंढरीत याबाबत प्रशासन मोठ्या जनजागृती करत असताना ही अनेकजण विनाकारण रस्त्यावर येत आहेत. पोलिसांनी अशांना समजावून सांगण्यासाठी आता रस्त्यावर फिरणार्‍यांना बुक्का लावून त्यांच्यासमोर संत अभंग गाण्यास सुरूवात केली आहे आणि ती ही वारकरी वेशात. दरम्यान विनाकारण भटकंती करणार्‍यांना समजावून सांगताना प्रशासनाच्या सहनशीलतेची कसोटी लागत असल्याचे चित्र आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी राज्य व केंद्र सरकार खूप प्रयत्न करत आहेत. देशभरात लॉकडाऊन पुकारला गेला आहे. लोकांनी घराबाहेर न पडता स्वतःला व आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र काही जण उगाचच गावात फिरताना दिसत आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई ही केली आहे. काल मॉर्निंग वॉकला जाणार्‍या 29 जणांवर कारवाई झाली मात्र तरी ही आज सकाळी पुन्हा अनेकजण फिरायला तयार झाले आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची वेळ पोलिसांवर आली. 18 जण या कारवाईत मंगळवारी सापडले होते.

यानंतर आज सकाळी पंढरपूरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. सागर कवडे व त्यांच्या सहकार्‍यांनी संचारबंदीत रस्त्यावर येणार्‍या नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी अभिनव संकल्पना राबविली. त्यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बाहेर फिरणार्‍या नागरिकांना थांबवून त्यांच्या कपाळी श्री विठ्ठलाला प्रिय असणारा बुक्का लावण्यास सुरूवात केली. पोलीस कर्मचारी प्रसाद औटी हे यावेळी जगत्गुरू संत तुकाराम महाराजांचे अभंग गात होते. याच बरोबर हरिपाठातील ओव्यांचे गायन ही यावेळी करण्यात आले. या प्रसंगी पोलीस कर्मचारी रणजित पाटील व अभिजित कांबळे यांनी वारकर्‍यांचे वेश परिधान केले होते. यानंतर ज्या नागरिकांना अडविले होते त्यांना सुगंधी दूध ही वाटण्यात आले.

प्रशासनाने कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घरात राहावे यासाठी किराणा , औषधे तसेच इतर जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळाव्यात अशी व्यवस्था केली असताना ही अनेकजण हीच कारणे सांगून रस्त्यावर उतरत आहेत. यामुळे लॉकडाऊन संकल्पनेला तडा जात आहे. अनेकांवर कारवाई करून ही विनाकारण भटकंती करणार्‍यांवर काहीच परिणाम होत नसल्याने पोलिसांनी आता हा नवीन फंडा आज वापरला आहे.
वास्तविक पाहता कोरोनाशी लढा देताना नागरिकांची सर्वाधिक साथ प्रशासनाला गरजेची आहे. लॉकडाऊन काळात नागरिकांनी घरात राहणे अपेक्षित असून यातच सर्वांची भलाई आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!