बंद मंदिर तरी पोहोचवतो वारी म्हणत वारकरी विठुरायाच्या दारी ॥ आज निर्जला एकादशी

पंढरपूर – कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत जे निर्बंध लावण्यात आले आहेत यामुळे राज्यातील प्रार्थनास्थळ बंद असल्याने पंढरीचे विठुरायाचे मंदिर ही कुलूपबंद आहे. येथे भाविकांना दर्शनासाठी जाता येत नाही. मात्र एक महिन्यावर आषाढी एकादशी आली असून तत्पूर्वीच्या निर्जला एकादशीनिमित्त सोमवारी पंढरीत काही वारकर्‍यांनी मंदिराबाहेर संत नामदेव पायरीचे दर्शन घेतले व नगरप्रदक्षिणा करून आपली परंपरा जपली.

मागील वर्षी 2020 ला ही अशीच स्थिती होती. आषाढी वारी होवूच शकली नव्हती. त्यावेळी कोरोनाची पहिली लाट होती. यानंतरच्या दुसर्‍या लाटेने ग्रामीण भागात अक्षरशः धुमाकूळ घातला. सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. आता लाट ओसरत असली तरी निर्बंध शिथिल करत असताना प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी नाही. यंदाची आषाढी देखील प्रतीकात्मकच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यास वारकरी संप्रदायाने ही मान्यता दिली आहे.
(व्हीडीओ व फोटो संकलन : श्री. सुनील उंबरे, पंढरपूर)
सोमवार 21 जून रोजी निर्जला एकादशी असून यानिमित्ताने काही वारकरी पंढरीत दाखल झाले असून त्यांनी संत नामदेव पायरीचे दर्शन घेवून नगरप्रदक्षिणा करण्यात समाधान मानले. सकाळपासून काही प्रमाणात भाविक येथे दाखल झाले आहेत. मोजक्या वारकर्‍यांसह ते नगरप्रदक्षिणा करताना दिसत होते.
आज एकादशी निमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेच्या मंदिरात 500 किलो फुलांची आरास करण्यात आली आहे. यासाठी गुलाब, गुलछडी, झेंडू, ऑरकेट, पिंक डी.जे., कामिनी या फुलांच्या रंगसंगतीत आकर्षक सजावट करण्यात आली आहे. ही आरास सचिन चव्हाण व संदीप पोकळे या पुण्यातील भाविकांनी दिली असून यासाठी पन्नास हजार रूपये खर्च आला आहे. ही सजावट साई डेकोरेटर्स शिंदे ब्रदर्स पंढरपूर यांनी केली आहे. अशी माहिती मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!