कोरोनामुक्त झालेल्या मात्र बिलासाठी थांबविलेल्या रूग्णाला मनसेने घरी पाठविले

सोलापूर चे जिल्हाधिकारी व पंढरपूरच्या प्रांताधिकार्‍यांचे लाभले मोलाचे सहकार्य

सोलापूर, दि.14 – केवळ बिल भरले नाही म्हणून कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णाला गेल्या चार दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये ठेवणार्‍या कुंभारी येथील अश्‍विनी ग्रामीण रुग्णालयाला मनसे पदाधिकार्‍यांनी जाब विचारत संबंधित व्यक्तीला त्याच्या घरी पंढरपूर तालुक्यात रवाना केले. गरीब रूग्णाला मदत करीत पदाधिकार्‍यांनी मनसेने पक्षप्रमुख राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त एक अनोखी भेटच दिली आहे.
कुंभारी येथील अश्‍विनी हॉस्पिटलमध्ये बार्डी (तालुका पंढरपूर) येथील एक व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला म्हणून दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर औषधोपचार झाल्यावर त्यांची टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र हॉस्पिटल प्रशासनाने त्यांचे बिल 32 हजार 800 रूपये केले. वास्तविक पाहता कोरोनाग्रस्तांवर मोफत उपचार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असतानाही या रूग्णालयाने बिल मागितले होते. पैसे न दिल्याने संबंधित रुग्णाला हॉस्पिटल प्रशासनाने सोडले नाही. अखेर त्यांनी मनसेचे जिल्हा सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. धोत्रे यांनी याबाबत पालकमंत्र्यांपासून ते सिव्हिलच्या वैद्यकीय अधिक्षकांपर्यंत सर्वांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरआणि पंढरपूर येथील प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी खूप मदत केली.
जिल्हाधिकारी यांनी स्वतः या घटनेची दखल घेऊन अश्‍विनी हॉस्पिटल प्रशासनास रुग्णाला त्वरित सोडण्याचे आदेश दिले. मनसे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सकाळी जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, उपजिल्हा अध्यक्ष अमर कुलकर्णी, राहुल अक्कलवडे यांनी कुंभारी या रूग्णालयात जावून हॉस्पिटल प्रशासनास याबाबत जाब विचारला. जिल्हाधिकारी यांना तेथून थेट फोन लावून याबाबतची कल्पना दिली. यानंतर हॉस्पिटलने कोणतेही बिल न घेता त्या रुग्णाला आपल्या गावी रूग्णवाहिकेने रवाना केले. दरम्यान, रविवार, 14 जून रोजी पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा वाढदिवस. याच दिवशी मनसेच्या पदाधिकार्यांनी गरीब रूग्णाला न्याय देत राज ठाकरे यांना वाढदिवसाची अनोखी भेट दिली.

जिल्हाधिकार्‍यांचे आभार
पंढरपूर तालुक्यातील बार्डी येथील रूग्णाला सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पंढरपूरचे प्रांताधिकारी ढोले,तहसीलदार वैशाली वाघमारे यांचे मोठे सहकार्य लाभले. या दोघांना मनसेच्या पदाधिकार्‍यांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी फोननवरून चौकशी केली. त्या रूग्णाला सहकार्य केल्याबद्दल मनसेचे जिल्हा सरचिणीस दिलीप धोत्रे यांनी त्यांचे आभार मानले.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!