बुधवारपासून दोन हजार भाविकांना मिळणार श्री विठ्ठलाचे दर्शन

पंढरपूर, – राज्य सरकारच्या निर्णयानुसार येथील विठ्ठल रक्मिणी मातेचे मंदिर जवळपास आठ महिन्यांनी सोमवार (दि. 16) दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक असून दिवसभरात एक हजार भाविकांना दर्शनाची सोय करण्यात आली होती. आता यात वाढ करत बुधवार 18 नोव्हेंबरपासून 2 हजार भाविक मुखदर्शन घेवू शकणार आहेत. याबाबतचे नियोजन करण्यात आल्याची माहिती मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

यासाठी कोरोना प्रतिबंधक आरोग्य विषयक सर्व नियम पाळावे लागणार आहेत.पंढरपूर हे देवाच्या पदस्पर्श दर्शनासाठी प्रसिध्द असले तरी सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भाविकांना पदस्पर्श दर्शनाऐवजी मुखदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. 16 नोव्हेंबर पासून प्रायोगिकतत्वावर सुरुवातीला दिवसभरात केवळ दहा तासच 1 हजार भाविकांना दर्शनाची रोज सोय करण्यात आली होती. मात्र भाविकांचा प्रतिसाद पाहता आता बुधवार 18 नोव्हेंबर पासून 2 हजार भाविकांच्या दर्शनाची सोय करण्यात आली आहे.यासाठी ऑनलाइन पध्दतीने नोंदणी करणे गरजेचे आहे. दर्शनासाठी 65 वर्षावरील वृध्द तसेच दहा वर्षाखालील लहान मुले, गर्भवती महिला व आजारी व्यक्तींना दर्शनाची परवानगी देण्यात आलेली नाही. दर्शनाला येणार्‍या भाविकांना कोविड 19 बाबतचे सर्व नियम पाळावे लागणार असून मास्क तसेच दर्शनाला जाताना हाताला सॅनिटायझर लावणे व दोन भाविकांमध्ये सहा फूट अंतर राखणे बंधनकारक करण्यात आले आहे.

मंदिर दर्शनासाठी सुरू होत असताना मंदिरे समितीच्या वतीने सुरक्षा, वैद्यकीय सुविधा व सूचना प्रसारण व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र अन्नछत्र व प्रसाद व्यवस्था बंद ठेवण्यात आलेली आहे.

One thought on “बुधवारपासून दोन हजार भाविकांना मिळणार श्री विठ्ठलाचे दर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!