बेजबाबदारपणे वागू नका, स्वत:चा, कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नका : उपमुख्यमंत्री

मुंबई, दि. 21 :-कोरोनाचा खरा विनाश अजून दिसायचा आहे’, हा जागतिक आरोग्य संघटना प्रमुखांनी दिलेला इशारा खोटा ठरवायचा असेल तर नागरिकांनी तो गांभीर्यानं घेऊन सावध व्हावं, यापुढचे काही दिवस घराबाहेर न पडता टाळेबंदी नियमांचं पालन करावं, नागरिकांनी बेजबाबदारपणे वागू नये, घराबाहेर पडू नये, गर्दीत जाऊन स्वत:चा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात, मालेगावसारख्या शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यानं चिंता वाढली आहे. मुंबईत कालच्या एका दिवसात साडेचारशेहून अधिक रुग्ण वाढले. राज्यातील रुग्णांची संख्या साडेचार हजारांवर गेली आहे. 24 मार्चच्या आधीपासून टाळेबंदी जाहीर करुनही झालेली वाढ गंभीर आहे. मुंबईतील 53 पत्रकार बांधवांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे, यातून कोरोनानं हातपाय कुठपर्यंत पसरले आहेत हे लक्षात येतं. तरीही शहरात रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये नागरिक विनाकारण गर्दी करत आहेत. यातून ते स्वत:च्या, कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण करत आहेत, हे थांबलं पाहिजे. घरातली व्यक्ती घराबाहेर जाणार नाही ही जबाबदारी आता कुटुंबातील महिलांनी, मुलांनी घेतली पाहिजे. घराबाहेर जाण्यापासून सर्वांना रोखलं पाहिजे, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आपले डॉक्टर, आपले पोलीस, या सर्वांनी आपल्याला घराबाहेर न पडण्याचं, घरातच थांबण्याचं, गर्दी न करण्याचं, सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या आवाहनानुसार आम्ही देखील सामाजिक अंतराचं भान राखून, सुरक्षितता बाळगून कर्तव्ये पार पाडत आहोत. किमान अधिकारी व सहकाऱ्यांना सोबत घेऊन, बैठका घेऊन विषय मार्गी लावत आहोत. केंद्र व राज्य सरकारं, सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, शासकीय व स्वयंसेवी यंत्रणेतील प्रत्येक जण जोखीम पत्करुन आज कर्तव्य पार पाडत आहेत. नागरिकांनी घरातच थांबून साथ द्यावी, ही त्यांची अपेक्षा आहे. नागरिकांनी दाखवलेला संयम, सहकार्यामुळेच राज्यातील काही जिल्हे आजही कोरोनामुक्त आहेत. नांदेड, सांगलीसारखे जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांच्यापासून बोध घेऊन आपला जिल्हाही कोरोनामुक्त करण्याचा निर्धार करुया. आपण सर्वांनी पुढचे काही दिवस घरातंच थांबण्याचा निर्धार केल्यास कोरोनाच्या लढाईत विजय नक्की आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. मुंबई, ठाणे, पुण्यात, मालेगाव सारख्या शहरात पुढचे काही दिवस टाळेबंदी नियमांचं मनापासून, स्वयंशिस्तीनं काटेकोर पालन करावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत जात-पात, भाषा-प्रांत, धर्म-पंथ विसरुन एकजूट होऊन साथ देण्याची गरज आहे. कोरोनाचा लढा हा मानवतेच्या अस्तित्वासाठीचा लढा आहे. तो संपेपर्यंत कुठल्याही प्रकारचा वाद-विवाद-विसंवाद टाळला पाहिजे. पालघर जिल्ह्यातील गडचिंचले चौकीपाडा येथे झालेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी, निषेधार्ह असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. याप्रकरणाची सीआयडी चौकशी सुरु झाली असून शंभरहून अधिक आरोपींना अटक केली आहे. सर्व दोषींना कायद्याप्रमाणे कठोर शिक्षा नक्की होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!