भाजपाच्या बेरजेच्या राजकारणामुळे माढ्यात संजयमामांसमोर जबर आव्हानं

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाने उमेदवार जाहीर करण्यास वेळ घेतला असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे जोरदार फिल्डींग लावत बरजेचे राजकारण करीत अनेक मातब्बरांना कमळाच्या जवळ आणण्यात यश मिळविले. येथे सातारा भागातील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकिट देत माण, फलटण भागातील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे सुरूवातीला राष्ट्रवादीचे उमेदवार संजयमामा शिंदे यांच्यासाठी एकतर्फी वाटणारी निवडणूक आता चुरशीची तर बनलीच आहे पण येत्या काही दिवसात जबर आव्हानात्मक बनेल असे चित्र दिसू लागले आहे.
माढा लोकसभा मतदारसंघ हा सुरूवातीपासूनच चर्चेत राहिला आहे. राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना येथून लढण्याचे दिले गेले आमंत्रण, याचा त्यांनी केलेला स्वीकार, यानंतर निवडणूक रिंगणात न उतरण्याचा घेतलेला निर्णय, खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात केलेला प्रवेश व यापाठोपाठ भाजपाचे सहयोगी असणारे जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीला जवळ करत माढ्यातून घेतलेली उमेदवारी, सातारा भागातील काँगे्रसचे मातब्बर नेते तथा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मुख्यमंत्र्यांनी भाजपात दिलेला प्रवेश व त्यांची जाहीर केलेली उमेदवारी..या घटनाक्रमात काही दिवस येथील मतदार संभ्रमावस्थेत होता. आता चित्र स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादीचे संजय शिंदे व भाजपाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे दोन मातब्बर नेते एकमेकांसमोर आता उभे आहेत. माढा मतदारसंघात दोन्ही काँगे्रसचे वर्चस्व जरी दिसत असले तरी गेल्या पंधरा दिवसात येथे अनेक घडामोडी घडल्या आहेत. सातारा जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्षच भाजपात आले असून त्यांनी कमळाची उमेदवारी घेतली आहे. यामुळे माण व फलटण भागात दोन्ही काँगे्रसला हा मोठा धक्का मानला जातो. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे तगडे नेते व विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपात आल्याने त्यांचे गट ही कमळाच्या प्रचारात गुंतला आहे. माळशिरस तालुक्याबरोबरच अन्य तालुक्यात व सोलापूर मतदारसंघात ही मोहिते पाटील समर्थकांचा उपयोग भाजपाला होणार आहे.
मोहिते पाटील हे लोकसभेचे उमेदवार नसल्याने माढा लोकसभा मतदारसंघासह माळशिरस तालुक्यातील त्यांचे विरोधक जे पूर्वीपासून भाजपाशी निगडीत आहेत ते ही कमळाच्या प्रचारात गुंतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटील यांच्या विरोधात जी भाजपाप्रणित महाआघाडी तयार करण्यात आली होती त्या नेत्यांना ही नाईक निंबाळकर यांच्या प्रचारात उतरण्यास काहीच हरकत उरलेली नाही. रणजितसिंह निंबाळकर यांच्या पक्षप्रवेशावेळी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याबरोबर आमदार प्रशांत परिचारक , माजी आमदार राजेंद्र राऊत तसेच सांगोल्याचे शहाजीबापू पाटील हे उपस्थित राहिले होते. आता तर तालुकावार मेळावे होत असून यात हे नेते निंबाळकर यांच्या प्रचाराचे नियोजन करत आहेत. शनिवारी सांगोला व अकलूजमध्ये प्रचाराच्या बैठका पार पडल्या आहेत.
माढा विधानसभा क्षेत्रात पंढरपूर तालुक्यातील 42 गावांचा व जवळपास 90 हजार मतदारांचा समावेश आहे. या जोरावर येथे काँगे्रसचे जिल्हा उपाध्यक्ष कल्याणराव काळे माढ्यातून 2014 ला लढले होते व त्यांना 65 हजार मते मिळाली. आता 2019 ची ते तयारी करीत आहेत. तेथे त्यांचे विरोधक संजय शिंदे यांचे बंधू आमदार बबनराव शिंदे आहेत. यामुळे काळे हे लोकसभेला संजयमामांचा प्रचार करूच शकणार नाहीत. यासाठी त्यांनी थेट मुंंबई गाठून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व भाजपाला सहकार्य करण्यास तयार असल्याचे सांगितल्याचे समजते. काळे हे पुढील विधानसभेचा विचार करता शिंदे यांचा प्रचार करूच शकत नसल्याचा फायदा येथे भाजपाला होताना दिसणार आहे. येत्या दोन दिवसात ते कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतील.
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात संजय शिंदे व मोहिते पाटील यांच्यात राजकीय संर्घष असून शिंदे यांना लोकसभेला पराभूत करण्यासाठी रणजितसिंह मोहिते पाटील व त्यांचे सहकारी सर्वतोपरी प्रयत्न करणार हे निश्‍चित आहे. त्यांचे करमाळ्यापासून ते अन्य सर्वच समाविष्ठ मतदारसंघात समर्थक आहेत. शिवसेना व भाजपाने युतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी एकमेकांना सहकार्य करण्यात कोठेच कसर न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे माढा मतदारसंघात जेथे शिवसेना सावंत बंधूमुळे प्रबळ बनली आहे त्यांच्यावर ही नाईक निंबाळकर यांच्या विजयाची मोठी जबाबदारी टाकली जाईल. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे आमदार डॉ. तानाजी सावंत यांच्याशी निवडणूक प्रचाराच्या व्यूहरचनेबाबत चर्चा करत आहेत. करमाळ्याच्या राजकारणात संजय शिंदे यांचे विरोधक असणारे शिवसेना आमदार नारायण पाटील हे नाईक निंबाळकर यांच्या प्रचारात अग्रेसर आहेत. आमदार पाटील हे मोहिते पाटील समर्थक ही असल्याने ते राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या विरोधात ताकदीनिशी सहकार्य करणार हे निश्‍चित आहे.
संजय शिंदे हे शरद पवार यांचे शिष्य आहेत. त्यांनी साडेचार वर्षे भाजपाबरोबर राहून महाआघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळविले तसेच अनेक कामे मार्गी लावून घेतली. शरद पवार हे माढ्यातून निवडणूक लढविणार नाहीत हे जसे स्पष्ट झाले तसे राष्ट्रवादी शिंदे यांना पक्षात आणून उमेदवारी देवू शकते हे निश्‍चित झाले होते. शिंदे यांना भाजपाकडून लोकसभेच्या उमेदवारीची विचारणा झाली होती. परंतु त्यांनी लोकसभेला आपण इच्छुक नसल्याचे कळविले मात्र राष्ट्रवादीत जावून उमेदवारी घेतल्याने भाजपा नेत्यांची चांगलीच गोची झाली. यानंतर अनेक घडामोडी घडल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपाने जवळ केले व उमेदवारी दिली.
संजय शिंदे यांनी आपला प्रचार मागील आठवड्यापासूनच सुरू केला आहे. यासाठी तालुकानिहाय बैठका ही होत आहेत. प्रचारात त्यांनी आघाडी घेतली आहे. भाजपाचा उमेदवार उशिरा ठरल्याने आज शनिवार पासून त्यांची लगबग सुरू झाली आहे. संजय शिंदे यांचे माढा मतदारसंघात अनेक नेत्यांची चांगले संबंध आहेत. ते ही बेरजेच्या राजकारणासाठी प्रसिध्द आहेत. सत्ताधारी पक्षाला झुंज द्यायची आहे हे माहित असून ही ते लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांची ही लोकसभा निवडणूक जिंकण्याची योजना तयार असणारच. मुख्यमंत्री व भाजपाचे अन्य नेते ही निवडणूक प्रतिष्ठेची करणार हे ठाऊक असून ही शिंदे यांनी यात घेतलेली उडी पाहता येथील लढत अत्यंत चुरशीची होणार हे निश्‍चित.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!