भाजपा-सेनेचे उशिरा जुळून, प्रचार मात्र सुरू मिळून मिसळून

राज्यात भारतीय जनता पक्ष व शिवसेना हे सत्ताधारी आहेत व केंद्रात ही त्यांची युती असली तरी मागील साडेचार वर्षे सतत त्यांच्यात वाद विवाद पाहावयास मिळाले होते. येत्या निवडणुकांमध्ये युती होते की नाही असा संभ्रम होता. शिवसेना तर सतत स्वबळाचा नारा देत होती. मात्र लोकसभेची रणधुमाळी सुरू होताच दोन्ही पक्षांचे प्रमुख एकत्र आले आणि युती पुन्हा आकारास आली. इतके दिवस भांडलेले हे पक्ष मात्र असे की जवळ आले आहेत की त्यांचे पूर्वी कधीच भांडण नव्हते, असे चित्र दिसत आहे. माढा व सोलापूर मतदारसंघात तर दोन्ही पक्षांचा प्रचार अत्यंत मिळून मिसळून सुरू आहेत.
भाजपा व शिवसेनेेने जे समन्वय नेमले आहेत त्यांच्यातील समन्वय चांगला असल्याचे दिसत आहे. माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी व भाजपात काट्याची टक्कर आहे. येथे शिवसेनेची भाजपाला मोठी गरज आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे ओळखून पहिल्याच प्रचार दौर्‍यात उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना बरोबर घेवून वाकाव गाठले. येथे शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार डॉ.तानाजी सावंत यांची भेट घेतली तसेच पुढील प्रचाराची व्यूहरचना आखली. प्रचार आता सुरू असून येथे भाजपा व सेनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये चांगला समन्वय दिसून येत आहे. पंढरपूरमध्ये झालेल्या प्रचार सभेत ही शिवसेनेचे नेेते प्रा. शिवाजी सावंत यांच्यासह सर्व पदाधिकारी सहभागी झाल्याचे दिसत होते. सोलापूरमध्ये ही अशीच स्थिती आहे. चंद्रकांत पाटील यांनी सोलापूरचा दौरा ही केला आहे. भाजपाला सोलापूरची जागा कोणत्याही स्थितीत राखायची आहे. तर माढ्याची वाढवायची असल्याने सोलापूर जिल्ह्यावर जास्त लक्ष केंद्रित केले जात आहे. माढ्यात भाजपात अनेकांना प्रवेश दिला गेला आहे.
ग्रामीण भागात शिवसेनेची ताकद जास्त असून माढा , करमाळा, माळशिरस, पंढरपूर, सांगोला भागात हे दिसून आले आहे. याच बरोबर सोलापूर शहरासह मोहोळ, मंगळवेढामध्ये ही शिवसेना अत्यंत मजबूत स्थितीत आली आहे. या लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक येत असल्याने शिवसेना व भाजपाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी पुढील लढतींची पूर्वतयारी म्हणून या निवडणुकीकडे पाहण्यास सुरूवात केली आहे. माण, फलटण मध्ये शिवसेना व भाजपा विस्तारण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सोलापूर महापालिकेत शिवसेनेने आपली ताकद दाखविली आहे. मोहोळ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मंगळवेढ्यात शिवसेनेचे काम असून येथे आता शैला गोडसे यांच्या रूपाने चांगले नेतृत्व पक्षाला मिळाले आहे तर पंढरपूरचे संभाजीराजे शिंदे हेच आता या विभागाचे जिल्हा प्रमुख असल्याने याचा उपयोग लोकसभेला होवू शकतो. येथे परिचारक, काळे यांच्या सारखे मातब्बर गट भाजपात आहेत व त्यांना शिवसेनेची साथ मिळत असल्याने युतीत सध्या उत्साह आहे.
सोलापूरची लढत ही अत्यंत लक्षवेधी असून येथे काँगे्रसचे सुशीलकुमार शिंदे यांना चांगले वातावरण असल्याचे चित्र सुरूवातीला होते मात्र वंचित बहुजन विकास आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीने येथे रंगत आली आहे. भाजपाने डॉ.जयसिध्देश्‍वर महास्वामी यांना रिंगणात उतरविले आहे. ही जागा 2014 भाजपाने मोदी लाटेत जिंकली होती आता ती राखण्यासाठी भाजपाला शिवसेनेची पक्की साथ हवी आहे. कारण ही तिरंगी लढत अत्यंत चुरशीची बनली आहे. सर्वत्र अ‍ॅड. आंबेडकर यांना पाठिंबा वाढत चालला आहे.
याच बरोबर माढ्यात ही राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे हे मातब्बर असून या मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा मोठा मतदार आहे. येथे भाजपाच्या गोटात रणजितसिंह मोहिते पाटील, कल्याणराव काळे तसेच शंभूराजे जगताप सहभागी झाले असले तरी शिवसेनेची संपूर्ण ताकद येथे भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी असणे गरजेचे बनले आहे. सध्या येथे शिवसेना व भाजपा एकत्र दिसत आहेत. कुर्डूवाडी भागातील जुन्या जाणत्या शिवेसना नेत्यांची भूमिका या लोकसभा निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे.

 

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!