भारतनानांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भगिरथ भालकेंची जनसंवाद यात्रा , शनिवारपासून होणार सुरूवात

पंढरपूर- पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार कै. भारतनाना भालके यांच्या जयंतीचे औचित्य साधून युवा नेते व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके यांच्या नेतृत्वाखाली शनिवार 13 फेब्रुवारीपासून जनसंवाद यात्रा महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आली असून याची सुरूवात मंगळवेढ्यातून होत आहे. या यात्रेस हिरवा कंदील सहकारमंत्री बाळासाहेब पाटील दाखविणार असून आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील असतील.
मंगळवेढा शहरातील आठवडा बाजार चौकातून ही जनसंवाद यात्रा सुरू होणार असून यानिमित्ताने शनिवारी दुपारी 4 वाजून पाच मिनिटांनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या जनसंवाद यात्रेच्या शुभारंभप्रसंगी महाविकास आघाडीमधील घटकपक्षांचे पदाधिकारी व आमदार उपस्थित राहणार असून यात काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे, जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, विठ्ठल परिवाराचे नेते कल्याणराव काळे, राष्ट्रवादीचे उत्तम जानकर, काँगे्रस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, शिवसेनेचे पंढरपूर जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता म्हस्के, रिपाइं (कवाडे गट)चे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
पंढरपूरचे आमदार कै. भारत भालके यांचे नोव्हेंबर महिन्यात निधन झाले आहे. यानंतर आता या गटाच्या नेतृत्वाची धूरा त्यांचे चिरंजीव भगिरथ भालके यांच्या खांद्यावर आली असून त्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ आहे. अपेक्षेप्रमाणे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद भगिरथ भालके यांना देण्यात आले आहे. दरम्यान आता भालके हे मतदारसंघातील दोन्ही तालुक्यातील जनतेशी संवाद साधण्यासाठी येत आहेत. आगामी काही दिवसात या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. यात महाविकास आघाडी एकत्रितपणे येथे उमेदवार देणार हे निश्‍चित आहे. यासाठी जनसंवाद यात्रेचे नियोजन देखील पंढरपूर- मंगळवेढा महाविकास आघाडीच्या वतीनेच करण्यात आले आहे.
या जनसंवाद यात्रेची सुरूवात कै. भारत भालके यांच्या जयंतीचे औचित्य साधून करण्यात आली असून कै. आमदार भालके या दोन्ही तालुक्यात दांडगा जनसंपर्क होता. त्यांनी 2009 ची विधानसभा निवडणूक लढविण्यापूर्वी मतदारसंघाची पुनर्रचना लक्षात घेवून मंगळवेढा व पंढरपूर भागात आला संपर्क ठेवला होता. त्यांनी आपल्या याच जनसंपर्काच्या जोरावर तीनवेळा विधानसभा निवडणूक जिंकली होती. आता त्यांच्यानंतर या जागेवर भालके कुटुंबातील व्यक्तीचा उमेदवारी द्यावी अशी भालके समर्थकांची मागणी आहे. आता जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने भगिरथ भालके यांनीही मतदारांपर्यंत पोहोचण्याचे धोरण अवलंबिले आहे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!