मंदिरांसाठी पॅकेज द्या, गुरव समाजाला मदत करा :भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

मुंबई -कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाल्यानंतर गेले सुमारे चार महिने राज्यातील मंदिरे बंद आहेत. त्यामुळे तेथे पूजाअर्चा करणाऱ्या गुरव समाजाचे उत्पन्न बंद झाले असून उपासमारीची वेळ आली आहे. त्याचवेळी, मंदिराच्या पूजेचा व देखभालीचा खर्च कायमच आहे. त्यामुळे राज्य सरकारने मंदिरांच्या देखरेखीसाठी पॅकेज जाहीर करावे आणि गुरव समाजाला थेट आर्थिक मदत करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

पाटील यांनी गुरव समाजाच्या प्रतिनिधींच्या बैठकीस वेब संवादाद्वारे संबोधित केले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे गुरव समाजासाठी मागण्या केल्या. या बैठकीस राष्ट्रीय गुरव महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रतापराव गुरव उपस्थित होते.

चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, मंदिरांमध्ये पूजा करणाऱ्या व मंदिरांची देखभाल करणाऱ्या गुरव समाजाला गेले चार महिने सोसलेला आर्थिक ताण व आगामी दोन महिन्यांची तरतूद अशी सहा महिन्यांसाठी रोख आर्थिक मदत करावी. मंदिरांची साफसफाई, देखरेख, सुरक्षा व पूजाअर्चा याचा खर्च लॉकडाऊनमध्येही चालूच आहे. त्याचा भार गुरव समाजावरच पडत आहे. राज्य सरकारने मंदिरांसाठीचे आर्थिक पॅकेज जाहीर करावे. लॉकडाऊनच्या काळातील मंदिरांचे वीजबिल प्रचंड मोठे आले आहे. मंदिरांच्या वतीने राज्य सरकारने वीजबिल महावितरणकडे भरावे.

पाटील यांनी अशी मागणी केली की, आगामी काळात जेव्हा शाळा सुरू होतील त्यावेळी गुरव समाजातील मुलांच्या शिक्षणाच्या खर्चासाठी राज्य सरकारने फीसह थेट आर्थिक मदत करावी आणि गुरव समाजाला सध्याच्या संकटात तातडीच्या कर्जाचा पुरवठा व्हावा यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा.

बैठकीत कार्याध्यक्ष गणेश सुराडकर, उपाध्यक्ष गणेश पुजारी, देवस्थान कमिटी प्रमुख रवी क्षीरसागर, प्रा. विवेक गुरव, मंदिर पर्यावरण अभ्यासक डॉ. राजेंद्र सराफ, महिला अध्यक्ष अर्चना नीळकंठ, रायगड विभाग प्रमुख बंडू खंडागळे, देवस्थान ईनाम प्रमुख वसंत टाकसाळे, देवस्थान ट्रस्टी बालाजी गुरव, युवा कार्याध्यक्ष डॉ. आनंद गुरव व कोंढाणपूर देवस्थान प्रमुख शिवदास भगवान सहभागी झाले. महाराष्ट्र अहेड पत्रकार समुहाचे प्रमुख हरिश प्रभू बैठकीचे समन्वयक होते.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!