मांडुळाची तस्करी करणारे तीनजण माळशिरस पोलिसांच्या ताब्यात

माळशिरस पोलिसांनी पुरंदावडेत तस्करांकडून जप्त केलेला दुर्मिळ मांडूळ सर्प.

माळशिरस – सदाशिवनगर परिसरामध्ये पोलीस गस्त सुरू असताना पुरंदावडे पालखी मैदानात अवैध रित्या मांडुळाची (दुर्मिळ सर्प) तस्करी करणा-या तिघांना माळशिरस पोलिसांना अटक केली आहे.
या कारवाईत संतोष दतात्रय टेळे (वय २४), पोपट रामा टेळे (वय ४५) (दोघे राहणार मांडवे),प्रवीण तानाजी दडस (वय २६) (रा.तामसिदवाडी )यांना ताब्यात घेत मांडूळ हस्तगत करण्यात आल आहे. या मांडुळाची किंमत ४० लाख रुपये असल्याची चर्चा आहे.

याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पुरंदावडे येथील पालखी मैदानामध्ये मांडुळाची तस्करी सुरू असल्याची माहिती पोलिसांना गोपनीय व्यक्तीमार्फत मिळाली होती.दरम्यान माळशिरस पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके हे सदाशिवनगर परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना पुरंदावडे येथील पालखी मैदानात तीन इसम अवैधरित्या जिवंत मांडूळ सर्पाची ४० लाख रुपयांना विक्री करण्यासाठी येत असल्याबाबतची माहिती त्यांना मिळाली.
पोलिसांनी कारवाई करत संतोष दतात्रय टेळे (वय २४), पोपट रामा टेळे (वय ४५) दोघे राहणार मांडवे,प्रवीण तानाजी दडस (वय २६) रा.तामसिदवाडी यांना ताब्यात घेतले असून मांडूळ सर्प हस्तगत करण्यात आला आहे. येथे गुलाबी रंगाच्या प्लास्टिक किटलीमध्ये जिवंत मांडूळ आणले होते.दरम्यान मांडूळ तस्करीचा एजंट तुषार लवटे ( राहणार मेडद ) हाही पोलिसांच्या हाती लागला आहे. या तस्करीमध्ये वापरण्यात आलेल्या दोन मोटारसायकली,मोबाईल व मांडूळ पोलिसांनी माळशिरस वनविभागाकडे पुढील कारवाईसाठी ताब्यात दिले आहे.

सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे,उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू,माळशिरसचे पोलीस निरीक्षक विश्वभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शशिकांत शेळके,सचिन हेंबाडे,समाधान शेंडगे,सोमनाथ माने, दतात्रय खरात, अमोल बकाल यांनी केली.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!