मोठ्या संघर्षानंतर महाराष्ट्रात ठाकरेराज, शिवसेनेत उत्साह

प्रशांत आराध्ये

मागील अनेक वर्षापासून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे सतत शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला देणार अशी घोषणा करत होते व ती इच्छा पूर्ण होण्यासाठी 2019 हे वर्ष उजाडावे लागले. भाजपासोबत युती करून शिवसेना लढली खरी मात्र मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवरून या दोन पक्षात बिनसले आणि निवडणूक पूर्व युती तुटली. दोन्ही काँग्रेस पक्षांना बरोबर घेवून आता शिवसेना सरकार स्थापन करत असून उध्दव ठाकरे हेच मुख्यमंत्री असणार आहेत.राज्यात काँगे्रस,राष्ट्रवादी पक्षाला एकत्रित लढून ही बहुमत मिळाले नव्हते मात्र ते आता सत्ताधारी बनले आहेत. तर दुसरीकडे सर्वात जास्त जागा जिंकणारा भाजपा हा विरोधी पक्ष झाला आहे. या पक्षाशी युती करून 56 आमदार निवडून आणणार्‍या दोन्ही काँग्रेस पक्षांनी मुख्यमंत्रिपद दिले आहे. उध्दव ठाकरे हे आता उद्या शपथ घेत आहेत. शिवसेना अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदासाठी मतमोजणीच्या दिवसापासूनच आडून बसली होती. यानंतर आता त्यांना हे पद मिळण्यासाठी तब्बल 33 दिवस वाट पाहावी लागली. या काळात भाजपाची साथ सोडावी लागली आहे तर विचार भिन्नता असलेल्या काँग्रेसला व राष्ट्रवादीशी मैत्री त्यांना करावी लागली आहे. या काळात राज्यात राष्ट्रपती राजवट लागली, यानंतर अजित पवार यांनी भाजपाची साथ केली पण ती टिकली नाही. आता महाविकास आघाडीची सत्ता राज्यात येत आहे.तीन पक्षांचे हे सरकार टिकणार नाही असा अंदाज विरोधकांचा असला तरी मागील काही दिवसात भाजपा विरोधात अन्य पक्ष एकटवल्याने त्यांच्यात एकी निर्माण झाली आहे. यातच अजित पवार यांनी अचानक भाजपाला साथ दिल्याने तर दोन्ही काँग्रेस व शिवसेनेत आणखीच जवळीक निर्माण झाली व त्यांनी सामुहिक रित्या आपल्या समोरील आव्हानांचा सामना केला. यात न्यायालयीन लढाईचा ही समावेश होता. राज्यात सध्या शरद पवार, उध्दव ठाकरे व काँग्रेसचे प्रदेशस्तरावरील नेत्यांमध्ये एकवाक्यता दिसत आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद हवे असल्याने दोन्ही काँग्रेस पक्षांनी पाच वर्षासाठी उध्दव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील असे सांगून टाकले आहे.

दोन रिमोट कंट्रोलचे नियंत्रण राहणार!हे तीन पक्षांचे सरकार चालविण्यासाठी उध्दव ठाकरे यांना मेहनत तर घ्यावीच लागणार आहे मात्र यावर काँग्रेसी परंपरेप्रमाणे नवी दिल्लीतून गांधी घराण्याचा रिमोट कंट्रोल ही राहणार हे कोणीच नाकारू शकत नाही. शिवसेनेला घेवून महाविकास आघाडी निर्माण करणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ही सतत लक्ष या सरकारवर राहणार असून ते यावर नियंत्रण ठेवणार हे निश्‍चित आहे. काँग्रेस पक्षात हायकमांड पध्दत असून नवी दिल्लीतून आदेश आल्याशिवाय काँगेसजनांचे पान ही हालत नाही. यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीचे सरकार चालविताना काँग्रेसचा दिल्लीतून हस्तक्षेप असणार हे निश्‍चित आहे. यासाठी कदाचित समन्वय समिती स्थापन केली जाईल असे दिसत आहे.

शिवसेनेसाठी अभी नही तो कभी नही..

देशात भाजपाबरोबर राज्य पातळीवर ज्या ज्या पक्षांनी युती केली आहे तेथे भाजपाने या लहान प्रादेशिक पक्षांची साथ घेत आपला विस्तारवाढ केला असल्याचे दिसून आले आहे. अनेक लहान लहान पक्षांचे अस्तित्व संपून ते भाजपातच विलीन झाले आहेत. विधानसभेला महाराष्ट्रात ही महायुतीच्या अनेक घटकपक्षांनी आपले उमेदवार भाजपाच्या कमळ चिन्हांवर उभे केले होते. येथे भाजपाने शिवसेनेला ही यंदा कमी जागा दिल्या होत्या. यावरूनच बरेच काही स्पष्ट  होते. शिवसेनेने ही निवडणूक होई पर्यंत आपले पत्ते उघडले नाहीत. निकालानंतर शिवसेनेशिवाय सरकारच बनू शकत नाही हे निश्‍चित झाले व त्यांनी आपली बार्गेेनिंग पॉवर दाखवून दिली. मुख्यमंत्रिपदाची मागणी केली जी भाजपाने फेटाळली. यानंतर शिवसेनेने आपला मार्ग निवडला. जर शिवसेना भाजपाच्या सोबत गेली असती तर त्यांना मुख्यमंत्रिपद मिळालेच नसते. उलट आमदारांच्या संख्याबळानुसार मंत्रिपद वाट्याला आली असती. शिवसेनेने आपला मुख्यमंत्रिपदाचा दावा कायम ठेवत दोन्ही काँग्रेस बरोबर जाण्याचा जो निर्णय घेतला तो त्यांच्या पक्षाच्या हिताचा आहे. आज शिवसेनेचा आत्मविश्‍वास ही वाढला आहे व देशाच्या राजकारणातील महत्व ही. भाजपाबरोबर केंद्रात असून ही शिवसेनेला 18 खासदारांच्या मोबदल्यात केवळ एक मंत्रिपद देण्यात आले होते.

राज्यातील स्थानिक पातळीवरील सत्ता समीकरण बदलणार

गेली तीस वर्षे शिवसेना व भाजपाची युती होती. 2014 ला युती तुटली मात्र नंतर पुन्हा हे दोन्ही पक्ष एकत्र आले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ही अनेक ठिकाणी युती आहे. मात्र आता शिवसेना व भाजपाची राज्यातील व केंद्रातील युती तुटल्याने स्थानिक पातळीवरील समीकरण ही बदलली जाणार हे निश्‍चित आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी हे पक्ष एकत्रितच लढतात. आता त्यांना शिवसेनेची साथ मिळणार असल्याने त्यांची ताकद आणखी वाढेल तर भाजपाला नुकसान सहन करावे लागणार हे निश्‍चित आहे. महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपरिषद व पंचायत समित्यांसह अन्य सत्तास्थानांवर आता महाविकास आघाडीचा बोलबाला राहिल असे दिसत आहे. शिवसेना ही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विस्तारली असून याचाच फायदा भाजपाला होत होता. भाजपा हा शहरी पक्ष म्हणून ओळखला जातो. आता दोन्ही काँग्रेस व शिवसेना यांनी ग्रामीण पातळीवर ही एकत्र येवून काम केल्यास भाजपासमोर मोठे आव्हानं असणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!