मोहिते-परिचारक-सदाभाऊंसह अन्य नेत्यांमुळे माढ्यात कमळच फुलणारः मुख्यमंत्री

कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना पूर्ण करण्याची फडणवीसांची ग्वाही

मुंबई- मजबूत शिलेदार आमच्या समवेत आहेत. महाराष्ट्राला नवीन दिशा द्यायची आहे. माढा लोकसभा मतदारसंघ भाजपा जिंकणार हे निश्‍चित आहे. मागील वेळेस लढलेले मोहिते पाटील आणि सदाभाऊ दोन्ही ही मोठे नेते आमच्याकडे असून सुधाकरपंत व प्रशांत परिचारक यांच्यासह अन्य नेत्यांची ही साथ असल्याने येथे विजय आपलाच होणार असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी विविध नेत्यांमुळे भाजपा परिवार समृध्द होत असल्याचा दावा केला.
सातार्‍याचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपात प्रवेश केला त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, नवीन ताज्या दमाचे खेळाडू आपल्या टीम मध्ये असल्याने आयपीएल, टेस्ट असो की वन डे आपणच जिंकणार आहोत. रणजितसिंह मोहिते पाटील व निंबाळकर या दोघांनी ही कृष्णा भीमा स्थिरीकरणाची मागणी केली आहे व आपले सरकार ही योजना पूर्ण करण्यास कटीबध्द आहे.यासाठी मोठा निधी आणला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. आम्ही विदर्भात जास्त निधी देतो व पश्‍चिम महाराष्ट्रात कमी देतो असा आरोप होतो परंतु टेंभू, उमोडी यासारख्या पश्‍चिम महाराष्ट्रातील योजनांना भरीव निधी दिला गेला आहे.
अक्सिडेन्ट होण्यापेक्षा यू टर्न घेतलेला बरा हे कळल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातील आपली उमेदवारी मागे घेतल्याचा टोला यावेळी फडणवीस यांनी लगावला. या प्रसंगी त्यांनी सर्वांनी एकत्र येत माढा जिंका असे आवाहन केले. माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले, मी पक्षात निंबाळकरांना चार दिवस सिनिअर असून मी त्यांचे स्वागत करतो. माढ्याची जागा शंभर टक्के भाजपा जिंकणार अशी ग्वाही त्यांनी दिली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी हा चार जागांचा राष्ट्रीय पक्ष असून या जागा ही यंदा त्यांच्याकडून काढून घ्यायच्या आहेत. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांची महाराष्ट्रात 45 जागा जिंकण्याची इच्छा आपण पूर्ण करू या असे आवाहन पाटील यांन केले. यावेळी ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नम्र आणि शांत आहेत. परंतु त्यांच्या डोक्यात काय चालते ते चेहर्‍यावर येवू देत नाहीत.
यावेळी मंत्री गिरीश महाजन,सदाभाऊ खोत, विनोद तावडे, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत, सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासह सातारा व सोलापूर जिल्ह्यातील अनेक नेते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!