यंदाही न भरणार्‍या आषाढीत भाविकांना रोखण्यासाठी अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त

पंढरपूर– कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत सर्वाधिक रूग्ण आढळून आलेल्या महाराष्ट्रात गर्दी टाळण्यासाठी याही वर्षी आषाढी वारी भरणार नसून या कालावधीत पंढरपूरला येणार्‍या भाविकांना रोखण्यासाठी अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त नियुक्त केला जाणार असून यामध्ये दुहेरी लसीकरण झालेल्या कर्मचार्‍यांनाच तैनात केले जाणार असल्याची माहिती अपर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली.

आषाढी वारी संदर्भात आढावा घेण्यासाठी झेंडे हे शहर पोलीस ठाण्यात आले असता त्यांना पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, शहर पोलीस निरीक्षक अरूण पवार, तालुका पोलीस निरीक्षक किरण अवचर, ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भस्मे उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सलग दुसर्‍या वर्षी पंढरीची आषाढी यात्रा प्रतीकात्मक पध्दतीनेच साजरी होणार आहे. यंदा देखील केवळ मानाच्या 10 पालख्यांना वारीसाठी शहरात प्रवेश दिला जाणार आहे. या काळात तब्बल नऊ दिवस संचारबंदीचा प्रस्ताव असून भाविकांना रोखण्यासाठी मागील वर्षीप्रमाणेच जिल्ह्यात त्रिस्तरीय बंदोबस्त तैनात असणार आहे. मानाच्या दहा पालख्या शहरात पाच दिवस मुक्काम करणार असल्याने दर्शनासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच वाखरी पासून दीड किलोमीटर चालत संतांच्या पादुकासह वारकरी चालत येणार आहेत. यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. यामध्ये 1 हजार 800 पोलीस व 700 गृहरक्षक दलाचे कर्मचारी असे एकूण अडीच हजार कर्मचारी असणार आहेत. कोरोनाचा प्रसार होवू नये यासाठी ज्या कर्मचार्‍यांचे दुहेरी लसीकरण झाले आहे, त्यांनाच बंदोबस्तासाठी नियुक्त केले जाणार असल्याचे अतुल झेंडे यांनी स्पष्ट केले.

यासह बंदोबस्तासाठी तैनात कर्मचार्‍यांना एक किट दिले जाणार आहे. यामध्ये रेनकोट, एनर्जी ड्रिंक, प्राथमिक उपचाराची औषधे तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तू असणार आहेत. शहरात पालखीचा मुक्काम असणार्‍या मठाच्या परिसरात मोठा बंदोबस्त असणार आहे. एकादशी दिवशी परवानगी असणार्‍या महाराज मंडळींना नगर प्रदक्षिणा करण्यास मुभा दिली जाणार आहे. तर संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. मुळचे पंढरपूरचे असणारे नागरिक संचारबंदीच्या काळात शहरात येवू शकतात परंतु यासाठी त्यांनी रहिवासी असल्याचा पुरावा जवळ ठेवावा असे आवाहनही अतुल झेंडे यांनी केले.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!