यशस्वी स्त्रीमागे स्त्रीच खंबीरपणे उभी राहते हे सिध्द करू

 

सौ. स्वाती खिस्ते, पुणे

सकाळी संपादिका मॅडम यांचा फोन आला. तुम्ही महिला दिनानिमित्त लेख पाठविला नाही. त्यांना लवकरच पाठविते असे सांगून लेखनप्रपंच सुरू केला. मनात विचारांची चक्रे फिरू लागली. महिलांच्या आत्मविश्‍वासाबद्दल लिहावे की समस्यांबाबत..का प्रगती विषयी ..काही सुचेना. मुलीने जाता जाता सांगितले.. आई आपण गुगल ,व्हाटस्अ‍ॅपच्या जमान्यात आहोत. इतके टेन्शन का घेते.
खरचं आपण गुगलच्या म्हणजे अलीबाबाच्या गुहेतील खुल जा सिम सिमच्या जमान्यात आहोतच, पण मनातील भावना, विचार आणि प्रश्‍नांचे काय ? त्याला उत्तर मिळण्यासाठी भावना व्यक्त होते. तितकेच गरजेचे आहे. हे नव्या पिढीला कोण सांगणार ? त्यातील गंमत , समाधान वेगळेच असते. असो तेंव्हाच मनात आले की आजच्या काळातील स्त्रियांच्या समस्या काय आहेत बरं .. तर माझ्या समकालीन स्त्रियांना भेडसावते , मोबाईलसारखे तंत्रज्ञान मिळून त्यात पारंगत होणे, जेेंव्हा एखादे अ‍ॅप उघडायचे किंवा नवीन गोष्ट शिकायचे असेल तर घरातील सूज्ञ व्यक्तींकडे (मुलांना) विचारावे लागते. ते ही स्वयंपाक व इतर कामे आटोपल्यानंतरच. कारण आईने स्वयंपाक सोडून शिकणे पटत नाही. तेच ते किती वेळा सांगायचे तुला.. असा खोचक प्रश्‍न विचारला की, यांना आपण अ..आ.इ..ई ..बाराखडी व पाढे शिकविताना कधीच कंटाळा केला नाही हे आठवते.
असो, स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, मग मला भूतकाळातील चुलीतील स्वयंपाक करणार्‍या आजी, पणजी आठवितात. त्यांना ही पुढील तंत्रज्ञान शिकताना त्रास झाला असेलच ना.. स्टोव्ह, गॅस, मिक्सर अशा गोष्टी शिकून घेण्याचे तंत्र त्यांनी आत्मसात केलेच ना ! तर आपण ही हे शिकून प्रगत होवू या. हो..पण खरेच प्रगती केवळ यातून साधता येते का ? हा खरा प्रश्‍नच आहे. समाज माध्यमांवर व्यक्त होताना स्त्रियांसाठी धोकेच जास्त वाढलेले दिसतात. त्यातून होणारी फसवणूक विचार करायला लावते. आजची स्त्री सुशिक्षित नव्हे तर ती उच्च शिक्षित आहे. सर्वच क्षेत्रात ती आघाडीवर आहे. सागरापासून ते हिमालयापर्यंत तिने स्वतःला सिध्द केले आहे. पण तरीही तिचे मन असमाधानी आक्रोश का करत आहे ? कारण अजून ही समाजात तिला सुरक्षा लाभलेली नाही.
आज ग्रामीणपेक्षा ही शहरी भागात तिला स्वसंरक्षणाची खूप गरज आहे. सिध्दता प्राप्त करून ही तिला सुरक्षेसाठी अवलंबून राहावे लागत आहे. ती सुरक्षा केवळ शारिरीक दृष्ट्या नसून मानसिक दृष्ट्या ही खूपच तोकडी आहे. आज ही समाज माध्यमांवर फोटो टाकताना व विचार मांडताना आधी कुटूंबाचा विचार करावा लागतो. हे ही आहेत नव्या शतकातील स्त्री पुढील प्रश्‍न. वाढत्या अत्याचारात मुलींपासून ते वृध्देपर्यंत सर्वांचेच नाहक बळी जात आहेत. या प्रश्‍नांना समाज कसे सोडविणार..स्त्रियांची प्रगती झाली म्हणजे सर्वच क्षेत्रात त्या मुसंडी मारून पुढे गेल्या आहेत..अगदी राजकारणापासून ते बसचालक होण्यापर्यंत. पण एवढी एकच इच्छा असावी की आपली..खरं तर स्त्रियांना आता गरज आहे ती आपले योगदान पर्यावरण संतुलन राखण्यासाठी. स्त्रीने आता हवा, पाणी व ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच सेंद्रिय शेतीवर आधारित बागकाम अशा गोष्टी घराघरात रूजल्या पाहिजेत. डॉ. शैलजा दाभोळकर यांच्या सारख्या तपस्विनी हे काम करताना पाहिले की प्रेरणा मिळते.
आजच्या आधुनिक समाजाच्या ज्वलंत समस्येकडे डोळसपणे पाहून त्या कशा सोडविता येतील हे पाहिले पाहिजे, आणि सर्वात महत्वाचे एखाद्या यशस्वी पुरूषामागे एक स्त्री असते हे प्रचलित वाक्य बदलून एका यशस्वी स्त्री मागे स्त्रीच खंबीरपणे उभी राहते हे सिध्द करण्याची आता वेळ आली आहे. माझ्या सर्व मैत्रिणींना महिला दिनाच्या शुभेच्छा.

 

1,079 thoughts on “यशस्वी स्त्रीमागे स्त्रीच खंबीरपणे उभी राहते हे सिध्द करू