योगायोग : राष्ट्रवादी आमदार भालकेंच्या विठ्ठल कारखान्याचा गुरूवारी 10 वा. 10 मि. बॉयलर अग्निप्रदीपन
पंढरपूर, दि.5- वेणूनगर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना जो गतहंगामात बंद राहिला होता तो या 2020-21 च्या गळीतासाठी सज्ज असून गुरूवार 8 ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी बॉयलर अग्निप्रदीपन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कारखाना राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या नेतृत्वाखाली चालत असून नेमका यंदा बॉयलर अग्निप्रदीपनाचा मुहूर्त ही राष्ट्रवादी चिन्ह घड्याळाच्या दहा वाजून दहा मिनिटांचाच आहे ..हा एक योगायोग म्हणावा लागेल.
विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा आमदार भारत भालके यांच्या नेतृत्वाखाली चालविला जात असून मागील हंगामात तालुक्यातील काही कारखाने बंद राहिले होते. यात विठ्ठलाचा ही समावेश होता. 2019-20 च्या गळीत हंगामाच्या प्रारंभावेळी राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू होती. तेंव्हा भाजपा व शिवसेनेची सत्ता होती. निवडणुकीनंतर दोन्ही काँग्रेस व शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येण्यास काही आठवडे वाट पाहावी लागली. या काळात कमी असलेला ऊस तसेच राज्य सरकारकडून थकहामीबाबत योग्य वेळेत निर्णय न झाल्याने अनेक साखर कारखाने गळीत हंगामात उतरूच शकले नव्हते. सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर तालुक्यातील अनेक कारखान्यांची धुराडी पेटलीच नव्हती.
आता राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असून पक्षाध्यक्ष शरद पवार हे मुख्य मार्गदर्शक आहेत. 2019 ला विधानसभा निवडणुकीच्या वेळी पवार यांच्यावर विश्वास ठेवत भालके यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादीत जात घड्याळ चिन्हावर निवडणूक लढविली व विजय देखील मिळविला. भालके हे पवार यांचे कट्टर समर्थक समजले जातात. ते कोणत्याही पक्षात असले तरी त्यांचे नेहमीचे पवार यांच्याशी संबंध चांगलेच राहिले आहेत.