रयतक्रांतीला हवेत माढा व हातकणंगले मतदारसंघ

कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेने भाजपाकडे माढा व हातकणंगले या दोन मतदारसंघांची मागणी केली असल्याची माहिती पक्षाचे कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी दिली.

रयत क्रांती संघटनेची स्थापना खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी फारकत घेवून केली असून त्यांना हातकणंगले मतदारसंघात खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात निवडणूक लढवायची इच्छा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचे त्या मतदारसंघात काम ही सुरू आहे. दरम्यान खोत यांनी 2014 ला माढा लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना आव्हानं दिले होते. त्या रणधुमाळीत त्यांना 4 लाख 64 हजार मते येथे मिळाली होती. तर मोहिते पाटील यांना 4 लाख 89 हजार मतं मिळाली व ते 25 हजाराच्या मताधिक्क्याने विजयी झाले होते.

राज्यात 2014 ऑक्टोंबर महिन्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर काम सुरू ठेवले व याचे फळ त्यांना आमदारकी व राज्यमंत्रिपदाच्या रूपाने मिळाले. याच काळात खोत व खासदार शेट्टी यांच्यात राजकीय वाद निर्माण झाला व खोत यांनी स्वतंत्रपणे रयत क्रांती संघटनेची स्थापना केली आहे.

हातकणंगले मतदारसंघात खासदार शेट्टी 2009 व 2014 या दोन्ही वेळा विजयी झालेले आहेत. त्यांना तेथील मतदार सतत सहकार्य करत आले आहेत. मागील निवडणुकीपर्यंत सदाभाऊ खोत हे शेट्टी यांच्यासाठी काम करत होते. मात्र आता स्वाभिमानी शेतकरी संघटना एकसंघ राहिली नसून खोत यांनी स्वतंत्र पक्ष काढला आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाकडे 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी दोन मतदारसंघांची मागणी केली आहे. दोन दिवसापूर्वीच रयत क्रांतीचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले असून त्यांनी दोन लोकसभा जागांची मागणी केली आहे. यात माढा व हातकणंगले मतदारसंघाचा समावेश आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!