राजकीय चिखलफेक करण्यापेक्षा संकटकाळी एकत्र येवून जनतेला मदत करू : मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना आवाहन

सोलापूर – या अतिवृष्टीच्या संकटकाळात राजकारणाची चिखलफेक करण्यापेक्षा सत्ताधारी, विरोधक सर्वांनी मिळून जनतेला मदत करण्यासाठी प्रयत्न करावेत. असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे. ते सोलापूरला पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता श्री. ठाकरे यांनी आपण येथे विरोधक काय म्हणतात यावर टिप्पणी करायला आलो नाही तर अतिवृष्टीग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आल्याचे स्पष्ट केले.

विरोधीपक्षनेते फडणवीस यांनी नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने अगोदर मदत करावी असे वक्तव्य बारामतीत आज केले आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, केंद्र सरकार हे देशाचे आहे. माननीय पंतप्रधानांनी मला फोन करून अतिवृष्टीची माहिती घेतली व आवश्यक ती मदत केंद्र सरकार करेल अशी ग्वाही दिली. केंद्र सरकार हे काही परदेशातील नाही. आपत्तीच्या वेळी राज्यांना मदत करणे त्यांचे कर्तव्य आहे. विरोधी पक्षनेते बिहारमध्ये प्रचारासाठी जातात त्यांनी आता महाराष्ट्राला भरीव मदत मिळावी म्हणून राजधानी नवी दिल्लीत जावे. कारण ते ही राज्यातील जबाबदार राजकारणी असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले.

नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. सर्व माहिती गोळा केली जात आहे. सर्वांना मदत केली जाईल हे निश्चित. आपण आत्ताच याबाबत कोणतीही घोषणा करणार नाही. सर्व माहिती गोळा होताच तत्काळ निर्णय घेवू. यापूर्वी आपत्तीच्या वेळी राज्य सरकारने मदत केलीच आहे. आताही मदत देणे सुरूच आहे.पुढील तीन चार पुन्हा पावसाचा इशारा वेधशाळेने दिला आहे. सर्वांनी सतर्क राहावे.प्राणहानी होवू नये याची खबरदारी घ्यावी . राज्य सरकार आपल्या पाठीशी आहे हा दिलासा देण्यासाठी आपण येथे आल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!