लॉकडाऊन वाढल्याने पंढरीचे श्री विठ्ठल मंदिर १७ मे पर्यंत बंदच  राहणार

पंढरपूर, दि. 3- कोरोना चा प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन वाढल्याने पंढरपूरचे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर आता 17 मे पर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे मंदिरे समितीच्या वतीने कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी कळविले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकारने १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याने श्री विठ्ठल रूक्मिणीचे मंदिर ही १७ मे पर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंदच राहणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हे मंदिर १७ मार्च पासून भाविकांसाठी बंदच ठेवण्यात आले आहे. केंद्र सरकारने ३ मे पर्यंत देशव्यापी लॉकडॉऊनची घोषणा केली होती. यात आता १७ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. सध्या राज्यात कोरोना विषाणूचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यात ही कोरोना बाधित रूग्ण उपचार घेत आहेत.
लॉकडाऊनमुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद असले तरी श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेचे नित्योपचार अत्यंत काटेकोरपणे पाळले जात आहेत. भाविकांच्या श्रध्देला तडा जाणार नाही यासाठी पुरेपर दक्षता घेतली जात आहे. वारकरी सांप्रदयाचे श्रीं च्या नित्योपचारांबरोबर अन्य प्रथा परंपरा यावर कटाक्षाने लक्ष्य असते ही बाब विचारात घेता, पहाटे होणारी काकडा आरती, नित्यपूजा, महानैवेद्य, पोषाख, पर्यंतचे सर्व उपचार तसेच सध्या सुरू असलेली चंदन उटी पूजा परंपरेनुसार जो पूजोपचार बजावण्यात आला आहे, त्याच्या स्वरूपात किंवा त्या पध्दतीत कोणत्याही प्रकारचे खंड न पाडता सुरू आहेत. तसेच इतर सणवार, उत्सव परंपरेनुसार साध्या पध्दतीने साजरे करण्यात येत असल्याचे मंदिरे समितीच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याशी विचारविनिमय करून हा निर्णय समितीने घेतला असल्याचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी कळविले आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!