वाखरीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले पालख्यांचे स्वागत

पंढरपूर, दि.30 – आषाढी वारीसाठी पंढरपूरला येणार्‍या पालख्या या परंपरेप्रमाणे पौर्णिमेचा गोपाळकाला करूनच आपआपल्या गावी परत जात असतात. यंदा कोरोनामुळे शासनाच्या सर्व निर्देशांचे पालन आम्ही केले असून किमान आता सरकारने या पालख्यांना द्वादशी दिवशी परत न पाठविता पौर्णिमेला परत जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख अ‍ॅड. विकास ढगे पाटील यांनी केली आहे.दरम्यान मंगळवारी दशमी दिवशी सायंकाळी उशिरा पालख्या वाखरीतळावर बसने आल्या होत्या. स्वागत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
पालकमंत्री भरणे यांनी आपण या विषयावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री याबाबत योग्य तो निर्णय घेतील. असे त्यांनी स्पष्ट केले. शासनाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दहा पालख्यांना पंढरीत येण्यास परवानगी दिली होती. यासाठी आरोग्य विषयक सर्व नियम व वीसच लोकांना प्रत्येक पालखीसमवेत परवानगी आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून या पालख्या पंढरीनजीक वाखरीत आल्यावर परंपरेप्रमाणे संत नामदेव महाराजांची पालखी येथे पंढरीतून आली होती. पालखी तळावर सर्व पालख्या एकत्रित होत्या. येथेच प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, नगराध्यक्षा साधना भोसले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!