वारकर्‍यांची मागणी..प्रशासनाची लवचिकता, प्रत्येक पालखीतील तीस भाविकांना चालण्याची परवानगी

पंढरपूर- पालखी सोहळे वाखरीत दाखल झाल्यानंतर यातील सहभागी महाराज मंडळींनी सर्वांनाच म्हणजे प्रत्येक सोहळ्यातील चाळीस जणांना पंढरपूरपर्यंत चालत जाण्याची परवानगी मागितली, अन्यथा आम्ही एसटी बसनेच शहरात जावू असा पवित्रा घेतल्याने प्रशासनाने जवळपास एक तास त्यांच्याशी चर्चा करून अखेर वाखरी ते इसबावी बसने तर पुढे विसावा मंदिर ते पंढरपूर प्रत्येक पालखी सोहळ्यातील 30 जणांना पायी जाण्यास परवानगी दिली. यानंतर रात्रौ जवळपास सव्वा नऊ वाजता पालख्या वाखरीहून निघाल्या.
यापूर्वी प्रत्येक पालखीतील केवळ दोन जणांनाच पादुकांसमवेत प्रथा व परंपरा जोपासण्यासाठी चालत जाण्याची परवानगी देण्यात आली होती. संध्याकाळी पालखी सोहळ्यांनी मागणी केल्यानंतर यावर चर्चा झाली व जवळपास दहा पालखीतील तीनशेजण नंतर चालत पंढरीत दाखल झाले. या बैठकीत अपर जिल्हा पोलीस प्रमुख अतुल झेंडे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सर्व पालखी सोहळ्यातील विश्‍वस्तांबरोबर चर्चा केली व तोडगा काढला. आषाढीच्या सोहळ्यासाठी सर्व मानाच्या संतांच्या पालख्या सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत वाखरी पालखी तळावर दाखल झाल्या. त्यावेळी देहूतील संत तुकाराम महाराज संस्थान यांनी चाळीस वारकर्‍यांसह विसावा नव्हे तर पंढरपूरपर्यंत चालत जाण्याचा आग्रह धरला होता यास बाकी सर्वच पालख्यांनी अनुमोदन दिले.
संतांच्या पादुकांसह या पालख्या विसावा मंदिरापर्यंत पायी जाण्याचा अगोदर नियम करण्यात आला होता. विसावा मंदिरापासून प्रत्येक पालखीतील केवळ प्रातिनिधिक स्वरूपात दोनच वारकरी पंढरपूरपर्यंत पादुका घेवून चालत जातील. असेही शासकीय आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र वाखरी येथे आल्यावर वारकर्‍यांनी शासन आदेशाला न जुमानता पंढरपूरपर्यंत प्रत्येक संताच्या पादुकासमवेतचे 40 वारकरी चालत जातील, असा आग्रह धरला. याबाबत संत तुकाराम महाराज संस्थानने पादुका एसटी बसमधून वाखरी तळावर घेण्यापूर्वीच जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधीक्षकांना चालत जाण्याची मागणी केली होती.
कोरोनामुळे सलग दुसरा आषाढी एकादशी सोहळा प्रतीकात्मक पध्दतीने साजरा होत असून यासाठी मानाच्या नऊ पालख्या मर्यादित भाविकांसह सोमवार दशमी दिवशी संध्याकाळी उशिरा पंढरपूरमध्ये दाखल झाल्या. महापूजेसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आपल्या कुटुंबासह वाहनाने मुंबईतून निघून रात्रौ येथे पोहाचले. दरम्यान संचारबंदीच्या कडेकोट बंदोबस्तात मंगळवारी आषाढीचा महासोहळा होत असून वारकर्‍यांची यंदाही मानस वारीच होत आहे.
मागील सोळा महिन्यांपासून कोरोनाचे संकट सतत घोंगावत असून या संसर्गाच्या दोन लाटा येवून गेल्या आहेत. अद्यापही या आजाराचे संकट कमी झालेले नाही. यामुळे गर्दी टाळण्यासाठी सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम यावर निर्बंध कायम असून यामुळे पंढरीत मागील 16 महिन्यात एकही यात्रा भरलेली नाही. वारकरी संंप्रदायाचा कुंभमेळा मानली जाणारी सलग दुसरी आषाढी यात्रा ही प्रथा व परंपरा जोपासत प्रतीकात्मक साजरी होत आहे. यामुळे एरव्ही लाखो वारकर्‍यांच्या उपस्थितीत साजरा होणारा सोहळा हा मर्यादित चारशे ते पाचशे भाविक, पोलीस यंत्रणा व अन्य शासकीय विभागांच्या अधिकारी , कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत साजरा होत आहे. भाविकांना पंढरपूरमध्ये प्रवेश मिळत नसून त्यांना यंदाची आषाढीही घरी बसूनच मानस वारी म्हणूनच साजरी करावी लागणार आहे.
आषाढीसाठी मानाच्या नऊ पालख्या पंढरपूरमध्ये आपआपल्या ठिकाणाहून दशमी दिवशी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून वाखरी येथे दुपारपासून दाखल होत होत्या. पहिल्यांदा विदर्भातील कौंडण्यपूर येथून माता रूक्मिणीची पालखी येथे दाखल झाली होती. यानंतर अन्य पालख्या सायंकाळी सातपर्यंत येथे दाखल झाल्या. संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी दुपारी साडेतीननंतर येथे आली. यानंतर एका पाठोपाठ एक एक सोहळे येथे येथे येत होते. यात संत निवृत्तीनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, संत सोपानदेव, संत मुक्ताई, संत एकनाथ, संत निळोबा, संत चांगावटेश्‍वर यांचा समावेश होता. स्वागत श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी विठ्ठल जोशी तसेच सदस्य संभाजी शिंदे यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, उपजिल्हाधिकारी सचिन ढोले, पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम व अन्य अधिकारी उपस्थित होते. पालखी तळावर वाखरी येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
यानंतर प्रत्येक सोहळ्यातील मर्यादित भाविकांच्या समवेत संतांच्या पादुका पायी पंढरीकडे निघाल्या. वाटेत विसावा मंदिराजवळ पंढरपूरची मानाची असणार्‍या संत नामदेव महाराजांच्या पालखीने या संतांचे स्वागत केले. तर पालखी सोहळ्यांसमवेत आलेले अन्य भाविक हे बससेच्या माध्यमातून आपआपल्या मुक्कामस्थळी गेले होते. संध्याकाळी उशिरा सर्व संत पादुका आपआपल्या मठांमध्ये विसावल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी होवू नये यासाठी येथे मठांमध्येही विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान राज्यातील पावसाळी वातावरण पाहता राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व त्यांचे कुटुंब वाहनाने मुंबईहून पंढरीत रात्रौ उशिरा दाखल झाले. त्यांच्यासमवेत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे ही आहेत. मंगळवारी पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी मुख्यमंत्री सपत्नीक श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेची शासकीय महापूजा करणार आहेत. मागील वर्षी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पहिल्यांदाच आषाढीची महापूजा केली होती तेंव्हा ही कोरोनाच्या पहिल्या लाटेचे संकट होते व पंढरपूरमध्ये संचारबंदी होती तर आता या आजाराची दुसरी लाट सुरू असून यंदाही संचारबंदी पुकारण्यात आली आहे.
पंढरपूरमध्ये शुकशुकाट
आषाढी वारी असली तरी ती प्रतीकात्मक साजरी होत असून भाविकांना रोखण्यासाठी येथे संचारबंदी असल्याने नागरिक ही रस्त्यावर दिसत नाहीत. यामुळे दशमी दिवशी शहरात शुकशुकाट होता. कोरोनामुळे येथे यात्राच भरत नसल्याने मागील जवळपास दीड वर्षापासून पंढरपूरचे अर्थकारण कोलमडले आहे. मंदिर परिसरातील दुकानांना याचा मोठा फटका बसला आहे. शेकडो लहान मोठे व्यापारी अडचणीत आले आहेत. पंढरीचे अर्थकारण हे यात्रांवर चालते मात्र मार्च 2020 पासून कोरोना संसर्गाचा धोका कायम असल्याने सतत निर्बंध पुकारले जातात व यामुळे येथे भाविक येवू शकत नाहीत. यंदाची आषाढी यात्रा ही अशीच साजरी होत आहे. तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त त्रिस्तरीय पध्दतीने लावण्यात आला आहे. पंढरपूरकडे येणारे सर्व रस्ते बंद आहेत. बस व खासगी वाहतूक ठप्प आहे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!