विना अनुदानित शाळेतील शिक्षकांना सेवा संरक्षण

पंढरपूर – विद्यार्थी संख्या कमी झाल्याने शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्यात आले होते, आता त्या शाळेत पुन्हा पटसंख्या वाढल्याने शासनाकडे पाठपुरावा करून पद मंजूर करून अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना कार्यरत करून सेवा संरक्षण देण्याचा महत्वाचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती आमदार दत्तात्रय सावंत यांनी दिली.
राज्यामध्ये अनुदानित शाळेतील शिक्षकांना सेवेचे संरक्षण दिले जात होते, परंतु विना अनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांना हे सेवा संरक्षण मिळत नव्हते. ते मिळावे यासाठी दत्तात्रय सावंत, श्रीकांत देशपांडे व बाळाराम पाटील हे शिक्षक आमदार सातत्याने प्रयत्न करीत होते.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन असल्याने बरेच दिवस मंत्रालयाचे कामकाज ठप्प झाल्याने शिक्षकांचे प्रश्‍न प्रलंबित होते. कामकाज सुरू झाल्यानंतर आमदार सावंत हे मंत्रालयात थांबून प्रश्‍न मार्गी लावत आहेत. सेवा संरक्षणासाठी मंत्रालयीन स्तरावर सतत पाठपुरावा करून याबाबतचा आदेश घेवून राज्यातील हजारो शिक्षकांना न्याय मिळवून दिल्याबद्दल राज्यभरातून विना अनुदानित व अंशतः विना अनुदानित शाळेतील शिक्षकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
अनुदानित शाळेतील शिक्षक जर अतिरिक्त झाला तर त्याचे समायोजन रिक्त जागा असणार्‍या दुसर्‍या अनुदानित शाळेवर केले जाते. त्याप्रमाणे विना अनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळेवरील शिक्षक अतिरिक्त होत असेल त्याचे ही समायोजन विना अनुदानित शाळेवर किंवा अंशतः अनुदानित शाळेवर करण्यात यावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार दत्तात्रय सावंत यांनी दिली.

आषाढीसाठी त्रिस्तरीय बंदोबस्तास सुरूवात
पंढरपूर, – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता यंदा आषाढी वारीसाठी पंढरपूरला भाविकांना येण्यास मनाई आहे. या काळात बाहेरून कोणी पंढरीत येवू नये यासाठी जिल्हा, तालुका व शहर पातळीवर त्रिस्तरीय नाकाबंदी करण्यात आली असून याचा बंदोबस्त गुरूवारपासून लावण्यात आला आहे.
पंढरपूर शहरात आषाढीच्या या बंदोबस्तासाठी बाराशे पोलीस कर्मचारी व अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. शहराच्या सर्व मार्गांवर आता नाकाबंदी करण्यात आली आहे. येणार्‍या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. येथील उपविभागीय अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी आज पुणे व अन्य रस्त्यावरील या बंदोबस्ताची पाहणी केली.

आषाढीला भाविक नसले तरी विठ्ठल मंदिराला रोषणाई

पंढरपूर – कोरोना संसर्गामुळे पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी यंदा भाविकांना येथे प्रवेश नसला तरी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. यात्रा भरणार नसली तरी नित्योपचार व सजावट यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
आषाढी वारीला भाविक नसले तरीही दरवर्षीप्रमाणे मंदिराला रोषणाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. श्री विठ्ठल व रूक्मिणीचे दर्शन ऑनलाइन सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी आकर्षक रोषणाईचे काम पूर्ण करण्यात आले. गेल्या अनेक वर्षात यंदा प्रथमच आषाढी वारी विना भाविकांची साजरी होत आहे. केवळ मानाच्या पालख्यांना एकादशीला पंढरीत आणण्याचे नियोजन आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!