शिवसेनेने कमळावर जिल्ह्यात ताणलाय धनुष्यबाण 

शिवसेना व भारतीय जनता पक्ष हे सत्तेत एकत्र असले तरी त्यांचा विस्तारवाद आपआपल्या पातळीवर वेगाने सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात याची प्रचिती पदोपदी येत असून येथे या दोन्ही पक्षांनी आपली ताकद वाढविण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. शिवसेनेने जलसंधारणमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्यावर येथील जबाबदारी दिली असून त्यांना साथ देण्यासाठी या भागात सतत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे दौरे घडत आहेत.
लोकसभा निवडणुकीत शिवसेना व भाजपा या दोन्ही पक्षांनी एकमेकांना मनापासून साथ दिल्याने माढा, सोलापूर व उस्मानाबाद या जागा सहज जिंकता आल्या आहेत. मात्र विधानसभेला दोन्ही पक्षांची महत्वकांक्षा मोठी असल्याने जोवर जागा वाटप होत नाही तोवर प्रत्येक मतदारसंघात आपआपली ताक वाढविण्यावर त्यांचा जोर आहे. 2014 च्या विधानसभेला प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढल्याने 2019 च्या जागा वाटपात तिढा निर्माण होणार आहे. यामुळेच टोकाच्या निर्णयाची तयारी सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात भाजपाचे दोन मंत्री काम पाहात आहेत. त्यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची साथ आहे. येथे शिवसेनेची ताकद कमी पडत होती मात्र मागील एक वर्षात या पक्षाने जोरदार मुसंडी मारत प्रत्येक मतदारसंघात आपली यंत्रणा पुन्हा प्रस्थपित केली आहे.
भाजपाने पक्ष विस्तारवाढ करताना दोन्ही काँगे्रसमधील अनेकांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. शिवसेनेने ही तयारी केली असून जागा वाटपाचा तिढा सुटताच येथील अनेक मातब्बर हातात धूनुष्य घ्यायला तयार आहेत. सांगोला, बार्शी, माढा, करमाळा भागात आत्तापासूनच याची तयारी आहे. काही विद्यमान आमदारांची नावे ही आघाडीवर आहेत. विधानसभेच्या तोंडावर साखरपट्ट्यातील अनेक मातब्बर शिवसेनेत जातील असे चित्र आहे. या पक्षाने संयमाने काम सुरू ठेवले असल्याचे चित्र आहे. जागा वाटपात माढा, पंढरपूर, मोहोळ यासारख्या जागांवर बर्‍याच काथ्याकूट होणार असल्याचे शिवसेना व भाजपा जाणून आहेत. यासाठीच शिवसेनेने आपल्या हक्क्याच्या जागांवर मेळावे ,कार्यक्रम घेण्यास सुरूवात केली आहे. पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघात यासाठीच 3 ऑगस्ट रोजी पक्षाने मोठा मेळावा आयोजित केला आहे.
भाजपाने सोलापूर जिल्ह्यात 2014 च्या तुलनेत मोठी ताकद उभी केली हे मान्यच करावे लागणार आहे. मोहिते पाटील यांच्यासह अनेक मातब्बर गट पक्षात आले आहेत. मात्र शिवसेनेने देखील येथील आपला दरारा कायम ठेवल्याचे चित्र आहे. शिवसेना आपल्या मित्रपक्षाच्या हालचालींवर येथे लक्ष ठेवून आहे. योग्य वेळी ते आपला धूनुष्यबाण ताणण्यास ही सज्ज आहेत.
अनेकजण शिवसेनेच्या वाटेवर। सोलापूर जिल्ह्यात भाजपामध्ये लोकसभेपर्यंत मोठे इनकमिंग झाले. मात्र आता विधानसभेला शिवसेनेत येण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. स्थानिक राजकारणातील स्थिती पाहून निर्णय घेतले जात आहेत. सांगोला, बार्शी, माढा तसेच करमाळा भागातील तसेच वेळ पडल्यास पंढरपूर मधील मातब्बर नेते ऐन निवडणुकीत धूनुष्यबाण हाती घेण्यास तयार आहेत. जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून अनेकांनी मातोश्रीवर जावून शिवबंधन बांधण्याची तयारी केली आहे. यासाठी योग्य मुहूर्त शोधला जात आहे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!