शिष्य गुरूला आव्हानं देणार ?

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांना आव्हानं देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने रयत क्रांतीचे संस्थापक तथा कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्याची तयारी केल्याचे वृत्त असून शिवसेनेने ही जागा सोडावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वास्तविक पाहता खोत हे खासदार शेट्टी यांचे शिष्य होते व त्यांचे बोट पकडूनच ते शेतकरी चळवळीत आले होते. मात्र ते आमदार व मंत्री झाले आणि या गुरू- शिष्यात वाद निर्माण झाला व यानंतर ते कट्टर प्रतिस्पर्धी बनले.
2019 या लोकसभा निवडणुका भाजपाने अत्यंत प्रतिष्ठेच्या केल्या असून प्रत्येक जागा जिंकण्यासाठी त्यांची व्यूहरचना आखली जात आहे. सदाभाऊ खोत हे गतनिवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी पक्षाकडून महायुतीचे उमेदवार म्हणून उभे होते व केवळ पंचवीस हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. यानंतर त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेवर घेतले व राज्यमंत्री केले आहे. दरम्यानच्या काळात जिल्हा परिषद निवडणुकीत खोत यांचे चिरंजीव सागर यांचा पराभव झाला. यानंतर खोत व खासदार शेट्टी यांच्यात वाद निर्माण झाला. यानंतर खोत यांनी स्वतंत्रपणे रयत क्रांती संघटनेची स्थापना केली.
खोत हे भाजपाबरोबरच राहिले तर खासदार शेट्टी यांनी सरकारमधून बाहेर पडणे पसंत केले. त्यांनी सतत भाजपा सरकारला धारेवर धरले आहे. मागील 2014 च्या निवडणुकीत शेट्टी हे हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार होते व विजयी झाले. त्यावेळी त्यांना भाजपा व शिवसेनेने पाठिंबा दिला होता. 2019 ला त्यांचा पक्ष काँगे्रस आघाडीबरोबर जाईल अशी शक्यता होती मात्र अद्याप ही चर्चा सुरूच आहेत. त्यांनी दोन्ही काँगे्रसना 15 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.
दरम्यान हातकणंगले मतदारसंघात शेट्टी यांना शह देण्यासाठी आता भाजपाने येथून त्यांचेच जुने सहकारी व विद्यमान मंत्री सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्याची चाचपणी सुरू केली आहे. ही जागा युतीमध्ये शिवसेनेकडे असून येथून माजी खासदार निवेदिता माने यांचे चिरंजीव धैर्यशील निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. माने यांनी राष्ट्रवादी सोडून मागील वर्षी शिवसेनेत प्रवेश केला होता. यामुळे खोत यांच्या उमेदवारीसमोर ही अडचणीत आहेत. यासाठी शिवसेना व भाजपात चर्चा सुरू असल्याचे समजते. खोत हे आक्रमक वक्ते असून त्यांनी अनेक वर्षे स्वाभिमानीत काम केल्याने त्यांना तेथील सारी परिस्थिती माहित आहे. सध्या शेट्टी हे शेतकर्‍यांचे सर्वमान्य नेते असून त्यांना याच लोकसभा मतदारसंघात अडकवून ठेवण्यासाठीची ही व्यूहरचना असू शकते.
लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनंतर 2009 मध्ये हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीच्या निवेदिता माने यांचा पराभव केला. त्यावेळी त्यांना 4 लाख 81 हजार तर माने यांना 3 लाख 85 हजार मते मिळाली होती. 2014 मध्ये ही जागा आघाडीने काँगे्रस पक्षाला दिली व कलप्पा आवाडे यांना येथून शेट्टी यांच्या विरोधात उतरविण्यात आले, यावेळी शेट्टी यांना 6 लाख 40 हजार 428 तर आवाडे यांना 4 लाख 62 हजार 628 मते मिळाली होती. गतनिवडणुकीत खासदार शेट्टी यांचे मताधिक्क्य 1 लाख 78 हजाराच्या आसपास होते.
खासदार शेट्टी हे शेतकर्‍यांचे नेते असून त्यांनी आजवर अनेक निवडणुका लढविल्या आहेत व ते विजयीच होत आले आहेत. त्यांना सर्वसामान्यांचा मोठा पाठिंबा मिळतो हा अनुभव आहे. आता ते पुन्हा हातकणंगले मतदारसंघात उभारणार असून त्यांना रोखण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे व यासाठीच सदाभाऊ खोत यांना उमेदवारीसाठी आग्रह असल्याचे समजते.
मागील निवडणुकीत सदाभाऊ खोत हे माढा लोकसभा मतदारसंघात उभे होते. मुळचे सांगली- कोल्हापूर भागातील असणार्‍या खोत यांनी सोलापूर जिल्ह्यात येवून ऊस आंदोलनामुळे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोठी ताकद येथे उभी केली होती. याचा उपयोग 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना झाला. खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना लढत देताना त्यांनी येथे 4 लाख 64 हजार मते मिळविली होती तर मोहिते पाटील यांना 4 लाख 89 हजार मते मिळाली. पंचवीस हजार मतांनी मोहिते पाटील विजयी झाले होते.

2 thoughts on “शिष्य गुरूला आव्हानं देणार ?

 • March 10, 2023 at 7:10 pm
  Permalink

  Greetings from Colorado! I’m bored to tears at work so I decided to check out your blog on my
  iphone during lunch break. I love the information you provide here and can’t
  wait to take a look when I get home. I’m amazed at how fast
  your blog loaded on my phone .. I’m not even using WIFI, just 3G ..
  Anyways, wonderful site!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!