शेतरस्ते रुंदीकरणाची मोहीम हाती घ्या : पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रशासनाला सूचना

फेरफार नोंदी निर्गतीकरणाबाबत केले कौतुक

सोलापूर, दि.10: फेरफार नोंदी निर्गतीकरण अभियानाप्रमाणेच जिल्ह्यातील सर्व शेतरस्ते रुंदीकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोहीम हाती घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे केल्या.
माढा तालुक्यातील मोडनिंब येथे महाराजस्व अभियानांतर्गत फेरफार अदालत आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आमदार बबनराव शिंदे, आमदार राजेंद्र राऊत, जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, पंचायत समिती सभापती विक्रमसिंह शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव आदी उपस्थित होते.
पालकमंत्री भरणे म्हणाले, फेरफार नोंदी शेतकऱ्यांच्या बाबतीत फार महत्त्वाचे असतात. कोरोनाच्या कालावधीत फेरफार नोंदीच्या कामाकडे लक्ष देता आले नव्हते. पण आता महसूल प्रशासनाने अभियान राबवून गेल्या दहा दिवसांत सुमारे साडे अकरा हजार नोंदी निकालात काढल्या आहेत, ही बाब कौतुकास्पद आहे. मात्र महसूल प्रशासनाने आता यापुढे फेरफार नोंदीबाबत पुढाकार घेऊन कामकाज करावे. शेतकऱ्यांना त्रास होता कामा नये अशा पद्धतीने काम करावे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी शेतरस्ते नाहीत. याबाबत तहसीलदारस्तरावर विशेष मोहीम राबवून शेतरस्ते रुंदीकरण करण्यासाठी मोहीम राबवावी.
कोविड लसीकरणात सर्व शासकीय कर्मचारी यांनी सहभागी व्हावे. सर्व अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांनी लसीकरण करुन घ्यावे. त्याचबरोबर नागरिकांनी आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्यात, असेही श्री. भरणे यांनी सांगितले.
आमदार श्री. शिंदे यांनी महसूल विभागाने फेरफार अदालत घेऊन नोंदी निर्गत केल्या आहेत. पण अदालत प्रलंबित राहू नयेत यासाठी प्रयत्न करा, असे सांगितले.
आमदार श्री.राऊत यांनी वारस नोंदी, मयत नोंदी, वाटप नोंदी सुलभ व्हायला हव्यात. न्यायालयातील आदेशाच्या नोंदी लवकर लागाव्यात, यासाठी प्रयत्न करायला हवे, असे सांगितले.
यावेळी परीविक्षाधीन प्रशासकीय अधिकारी अंकित, उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, ज्योती कदम, उदयसिंह भोसले, दीपक शिंदे, जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे, तहसीलदार समीर माने, राजेश चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. जाधव यांनी केले तर आभार उपविभागीय अधिकारी श्रीमती कदम यांनी मानले.
पशुसंवर्धन विभागाच्या मोबाईल डिस्पेन्सरीचे अनावरण
यावेळी पशुसंवर्धन विभागाच्या मुख्यमंत्री पशुसंवर्धन योजनेतून सुरु करण्यात आलेल्या मोबाईल तपासणी दवाखान्याचे उदघाटन करण्यात आले. पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना फेरफार नोंदीचे दाखले वितरण करण्यात आले.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!