सर्व्हर क्रॅशमुळे तीन दिवसांच्या सोलापूर विद्यापीठ परीक्षा वेळापत्रकात बदल; 9 ऑक्टोबरपासून परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार

सोलापूर, दि.6- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. मात्र परीक्षेच्या ऑनलाइन पोर्टलवर व्हायरस अटॅकमुळे सर्व्हर क्रॅश झाले आहे. त्यामुळे सहा ते आठ ऑक्टोबर या तीन दिवसांच्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा 21 ते 23 ऑक्टोबर दरम्यान होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्रेणिक शहा यांनी दिली. नऊ ऑक्टोबरपासून होणाऱ्या परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसार होतील, अशी माहितीही त्यांनी दिली.

सोमवारी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा यशस्वीपणे विद्यापीठाकडून घेण्यात आली. मंगळवारी परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी ऑफलाइन परीक्षा सुरळीतपणे पार पडली. मात्र ऑनलाइन परीक्षेत सर्व्हर क्रॅशमुळे व्यत्यय आला. 6 ऑक्टोबर रोजी होणारी ऑनलाइन परीक्षा आता 21 ऑक्टोबर रोजी नियोजित वेळापत्रकानुसार होईल. 7 ऑक्टोबर रोजी होणारी परीक्षा 22 ऑक्टोबर रोजी तर 8 ऑक्टोबर रोजी होणारी परीक्षा 23 ऑक्टोबर रोजी नियोजित वेळापत्रकानुसार होतील, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.

सर्व्हर लोडमुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांची वेळ बदलण्यात आली असून 11:30 ते 4:30 या वेळेत होणारी परीक्षा दुपारी 3 ते रात्री 9 पर्यंत होईल, अशी माहिती परीक्षा मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्रेणिक शहा यांनी दिली. तांत्रिक कारणामुळे विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल झालेला आहे, याची सर्व विद्यार्थी शिक्षक, कर्मचारी व पालकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेले आहे.

*25 टक्के विद्यार्थ्यांची यशस्वी परीक्षा*

मंगळवारी विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या 25 टक्के एटीकेटी विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे परीक्षा दिली. सहा हजार पैकी 1 हजार 561 विद्यार्थ्यांनी मंगळवारी यशस्वीपणे परीक्षा दिली आहे. राहिलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा 21 ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!