सोलापूर जिल्हाः विकास कामांपेक्षा पक्षांतराच्या चर्चेवर सत्ताधारी आणि विरोधकांचा भर

हरीभाऊ

पंढरपूर-लवकरच विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्याची शक्यता असून सध्या सोलापूर जिल्ह्यात सत्ताधारी महायुतीकडे विरोधी पक्षातील आमदार व नेत्यांचा कल वाढला आहे. गेल्या पाच वर्षात भाजपा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंनी सोलापूर जिल्ह्यात जोरदार फिल्डींग लावत दोन्ही काँगे्रसच्या आघाडीचा बालेकिल्ला पार उद्ध्वस्त केला आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर काँगे्रस व राष्ट्रवादीमधील आमदार भाजपा व शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. येथे विकास कामांचा हिशोब देण्या ऐवजी सत्ताधारी व विरोधी दोन्ही बाजू पक्षांतराच्या चर्चेवरच मोठा भर देत असल्याचे वास्तव आहे. हे सारे मतदार पाहता असून तो ऐन निवडणूक रणधुमाळीत आपली ताकद ईव्हीएम मशीन द्वारे दाखवून देईल.लोकसभा निवडणुकीत पक्षांतराचे वादळ जिल्ह्यात धडकले. रणजितसिंह मोहिते पाटील, कल्याणराव काळे, करमाळ्याचे शंभूराजे जगताप याच बरोबर माढ्याचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यासह विविध तालुक्यातील नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. अपेक्षेप्रमाणे येथे खासदार भाजपाचाच झाला. आता विधानसभा निवडणुकांचे वारे घोंघावू लागले असून अवघ्या काही दिवसांत आचारसंहिता लागू होणार आहे. राज्यात अनेक विरोधी आमदारांनी भाजपा व शिवसेनेत प्रवेश केले आहेत. आता सोलापूर जिल्ह्यात ही याचे वारे वाहू लागले असून अक्कलकोटचे काँगे्रसचे आमदार सिध्दराम म्हेत्रे, पंढरपूरचे भारत भालके, माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे पक्षांतर करणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. विधानसभेसाठी राष्ट्रवादी व काँगे्रसच्या उमेदवार मुलाखतींना या आमदारांनी हजेरी लावली नव्हती. यामुळे तर आणखीच संशय बळावला आहे तर त्यांची पावले ही महायुतीच्या दिशेने असण्याची अनेक उदाहरणे सतत पुढे  येत आहेत. एकेकाळी शरद पवार व सुशीलकुमार शिंदे हे सांगतील ती  पूर्व दिशा अशी स्थिती असणार्‍या सोलापूर जिल्ह्यात आता भाजपा व शिवसेनेचा बोलबाला आहे. भाजपाकडे विरोधकांचा ओढा जास्त असला तरी या पक्षात नेते घेण्यास व जागा वाटपाच्या मर्यादा असल्याने काहींनी आपला मोर्चा शिवसेनेकडे वळविला आहे. समर्थकांचे मेळावे होत आहेत. करमाळ्याच्या राजकारणातील राष्ट्रवादीचा मातब्बर गट असणार्‍या बागल यांचे समर्थक ही आता शिवसेना..शिवसेना असा नारा देत आहेत तर तेथील विद्यमान शिवसेनेचे आमदार नारायण पाटील हे भाजपात जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. ते मोहिते पाटील यांचे समर्थक आहेत. आमदार दिलीप सोपल व बबनराव शिंदे यांनी 1995 मध्ये युतीसोबत काम केले असल्याने त्यांचे जुने संबंध शिवसेना व भाजपाशी आहेत. दरम्यान नव्यांची महायुतीत एंट्री होण्याची शक्यता असल्याने ज्यांनी अगोदरच भाजपा अथवा शिवसेनेत येवून काम सुरू केले आहे. त्यांची येथे चांगलीच गोची होत आहे. तर दुसरीकडे मतदार हैराण आहे की येथे विकास कामांपेक्षा पक्षांतरावर निवडणुकीच्या रणधुमाळीत जोर दिला जात आहे.मतदारराजा चर्चा करून उत्तर देत नाही तर तो ईव्हिएम मशीनद्वारे योग्य तो निर्णय देतो हे मात्र निश्‍चित.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!