सोलापूर विद्यापीठाचे संशोधन देशाला दिशादर्शक ठरेल: उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन

सोलापूर, दि.9– कोरोना संकटकाळात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदाच्या पातळीचा अभ्यास हा निश्चितच कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांचे जीवन हे आनंदी राहिले पाहिजे. त्याचे संशोधन होणे महत्त्वाचे होते, सोलापूर विद्यापीठाचे हे संशोधन महाराष्ट्राला नव्हे तर देशातील विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांसाठी दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

बुधवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संशोधकांनी मार्च ते ऑगस्ट 2020 या कालावधीतील कोरोना व लॉकडाऊनचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम झाला व विद्यार्थ्यांच्या आनंदाचा पातळीचा अभ्यास केलेला असून या संशोधन अहवालाचे प्रकाशन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांच्या हस्ते ऑनलाइन झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे यांनी केले. या संशोधनाबद्दल डॉ. प्रकाश व्हनकडे यांनी माहिती दिली.

मंत्री सामंत म्हणाले की, कठीण प्रसंगात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संशोधकांनी पुढाकार घेऊन चांगले संशोधन केले. याचा फायदा देशाला होईल. कोरोनाचे संकट असले तरीही, यातून मार्ग काढत पुढे जायचे आहे. नवे शिकायचे आहे, संकटावर मात करून यशस्वी व्हायचे आहे. अशाही परिस्थितीत चांगला अभ्यास विद्यापीठाकडून झाला, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. नवीन शैक्षणिक धोरणात समाविष्ट करण्यात आलेल्या अनेक बाबींची अंमलबजावणी सोलापूरसह राज्यातील अनेक विद्यापीठे करीत आहेत. महाराष्ट्राचे शिक्षण धोरणही देशाला दिशादर्शक ठरेल. आज कठीण प्रसंग असले तरीही अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत. अगदी सोप्या पद्धतीने बहुपर्यायी प्रश्न विचारून विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जातील. यासंदर्भात काही ठिकाणी आता समुपदेशनाची व्यवस्था केली जात आहे, ते करणे आवश्यकच आहे. येता काळात सोलापूर विद्यापीठासाठी भरपूर सहकार्य राहील, अशी ग्वाही मंत्री सामंत यांनी यावेळी दिली.

कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की, कोरोना संकट काळात सामाजिकशास्त्रे या संकुलातील संशोधकांच्या माध्यमातुन मार्च ते ऑगस्ट 2020 या कालावधीतील विद्यार्थ्यांच्या आनंदाच्या पातळीचा अभ्यास करण्यात आला. याचा अभ्यास व संशोधन करणे महत्त्वाचे होते की, कोरोना काळात विद्यार्थ्यांनी नवे काय शिकले, विद्यार्थी किती आनंदी होते, हे पाहणे फार महत्त्वाचे होते. निश्चितच विद्यार्थ्यांनी कोरोना व लॉकडाऊनचा घरी बसून चांगला फायदा केल्याचे दिसून येते. नवीन विचार, नवीन पुस्तक, नवीन कृती, नवे ज्ञान घेण्याचा प्रयत्न या कालावधीत झालेला आहे. निश्चितच या संशोधनाचा सर्वांना फायदा होईल, असेही कुलगुरू डॉ फडणवीस यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार डॉ. श्रीराम राऊत यांनी मानले. प्रा. चंद्रकांत गार्डी यांचे तांत्रिक साहाय्य लाभले.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!