सोलापूर, दि.10- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने विद्यार्थी हित लक्षात घेऊन व कोरोना संकटाचा विचार करून 19.26 टक्के परीक्षा शुल्क माफ करून तो विद्यार्थ्यांना परत केल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. राज्यातील एकमेव सोलापूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या हिताचा हा निर्णय घेतल्याचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
मागील सव्वा एक वर्षापासून कोरोना महामारीमुळे संपूर्ण व्यवस्थेत बदल झालेले आहे. कोरोना संकटाचा सर्वांनाच फटका बसलेला आहे. कोरोना महामारीमुळे गतवर्षी विद्यार्थ्यांच्या परीक्षा या ऑनलाईन व ऑफलाईनरित्या पार पडले. विद्यापीठाने कोरोना संकटाचा आणि विद्यार्थी हिताचा विचार करून 2019-2020 या वर्षात परीक्षा दिलेल्या सर्व अभ्यासक्रमांच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 19.26 टक्के शुल्क माफ करून तो त्यांना परत करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. याचा 20 हजार विद्यार्थ्यांना लाभ होतो. सुमारे 32 लाख रुपये विद्यापीठाने विद्यार्थ्यांना परत केलेले आहेत. संबंधित महाविद्यालयांकडे ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे. तेथून विद्यार्थ्यांना पैसे परत केले जाणार आहेत.
याचबरोबर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने प्रत्येक वर्षी 10 टक्के परीक्षा शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र यंदा कोरोना महामारीच्या संकटामुळे दहा टक्के परीक्षा शुल्क वाढ न करण्याचा निर्णय घेतल्याचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले. याचाही सर्व विद्यार्थ्यांना मोठा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व प्रक्रियेसाठी प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, वित्त व लेखाधिकारी श्रेणिक शहा यांचे सहकार्य लाभले.
*ऑनलाइन परीक्षा फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू*
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या सत्र परीक्षा येत्या जुलै-ऑगस्टमध्ये होणार असून यासाठी सध्या ऑनलाइन परीक्षा भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांशी संपर्क साधून विहित मुदतीत परीक्षा फॉर्म भरावे, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. विकास कदम यांनी केले आहे.