सोलापूर विद्यापीठ: 8500 विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा यशस्वी

पहिल्या दिवशी एटीकेटी विद्यार्थ्‍यांची होती परीक्षा
74 विद्यार्थ्यांनी दिली ऑफलाईन परीक्षा

सोलापूर, दि.5- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षेला सोमवारपासून सुरुवातीला एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेपासून सुरुवात झाली. नऊ हजार 794 एटीकेटीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी सोमवारी रात्री सात वाजेपर्यंत आठ हजार 500 विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे परीक्षा दिल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्रेणिक शहा यांनी दिली.

यंदा कोरोना संसर्गामुळे विद्यापीठाच्या पारंपरिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा या ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जात आहेत. सोमवारी पारंपारिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या एटीकेटीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडली. विद्यार्थ्यांनी घरी बसून ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा दिली. सोमवारी रात्री नऊ वाजेपर्यंत ही परीक्षा पार पडली. रात्री सातपर्यंत आठ हजार 500 विद्यार्थ्यांची यशस्वी पद्धतीने परीक्षा पार पडली. तर शहर व ग्रामीण भागातील एकूण 74 विद्यार्थ्यांनी ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा दिली.

ऑनलाइन परीक्षा देताना विद्यार्थ्यांना सर्व्हर डाऊन कारणास्तव कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी रात्री उशिरापर्यंत विद्यापीठाची पोर्टल व लिंक ओपन ठेवण्यात आली होती. तरीही ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा तांत्रिक कारणास्तव राहून गेली आहे, अशांसाठी 25 ऑक्टोबरनंतर पुन्हा परीक्षा घेण्यात येईल, असे विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

*एकाही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही*

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षेला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. 90 टक्के विद्यार्थ्यांची परीक्षा यशस्वीपणे पार पडली आहे. रात्री नऊ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली गेली. तांत्रिक कारणास्तव ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा राहिली असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी 25 ऑक्टोबर नंतर पुन्हा परीक्षा घेतली जाईल. एकाही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही.
डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरू

*परीक्षा नसेल तर लिंक ओपन करू नका*

ऑनलाइन परीक्षेसाठी विद्यापीठाकडून स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना युजर आयडी व पासवर्ड देण्यात आले आहे. पहिल्या दिवशी परीक्षा नसतानाही अनेक विद्यार्थ्यांनी पोर्टलवर जाऊन लिंक ओपन करत राहिले त्यामुळे इनऑरगॅनिक ट्रॅफिक निर्माण होऊन सर्वर डाऊन झाले होते. यासाठी ज्या दिवशी विद्यार्थ्यांची परीक्षा असेल त्याच दिवशी पोर्टल वर जाऊन लिंक ओपन करावे. विद्यापीठाकडून सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहेत. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्रेणिक शहा यांनी केले आहे.

*विद्यार्थी प्रतिक्रिया*

ऑनलाइन परीक्षा सुरळीत
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून आज ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. बीकॉम तृतीय सेमिस्टरची परीक्षा मला घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने देता आले. सुरवातीलाच सर्व माहिती घेऊन परीक्षा दिल्याने अगदी सोप्या पद्धतीने ही परीक्षा ठरली.
श्वेता सावंत, विद्यार्थी

सोप्या पद्धतीची परीक्षा
विद्यापीठाकडून आज एटीकेटीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. कोरोना संकटकाळात घेतली गेलेली ऑनलाईन परीक्षा अतिशय सोप्या पद्धतीची होती. सुरुवातीला अगदी थोडा वेळ तांत्रिक अडचण झाली, ती मात्र नंतर विद्यापीठाकडून दूर करण्यात आली. परीक्षा चांगली झाली.
ईश्वर शिरसाड, विद्यार्थी

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!