पंढरपूर तालुक्यातील वाखरीची सून झाली लातूर जिल्ह्यात नांदुर्गाची सरपंच
*जोतिराम घाडगे या युवकाने नांदुर्गा ग्रामपंचायतीवर निवडून आणले पॅनल* *
पंढरपूर : वाखरी ( ता.पंढरपूर ) येथील सून नांदुर्गा (ता. औसा, जि लातूर ) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान झाली आहे. 9 फेब्रुवारी रोजी झालेल्या सरपंच निवडीत सौ. अश्विनी जोतिराम घाडगे यांची सरपंचपदी निवड झाली आहे. तर उपसरपंच पदी आशिष पोतदार यांची निवड झाली आहे.
वाखरी येथील जोतिराम बळीराम घाडगे हे मागील 20 वर्षांपासून लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील नांदुर्गा येथे सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. उमरगा -औसा विधानसभा मतदार आमदार अभिमन्यू पवार यांचा जोतिराम घाडगे हा कट्टर समर्थक आहेत. तर त्यांच्या सौभाग्यवती अश्विनी घाडगे या भाजप महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष आहेत. नुकत्याच झालेल्या नांदुर्गा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जोतिराम घाडगे यांनी स्वतंत्र पॅनल उभा केले होते. याशिवाय इतर दोन पॅनल निवडणूक रिंगणात असल्याने तिरंगी लढतीत जोतिराम घाडगे यांच्या पॅनेलने 11 पैकी 5 जागा जिंकल्या तर दुसऱ्या पॅनेलला 4 आणि तिसऱ्या पॅनेलला 2 जागा मिळाल्या.
निवडणुकीनंतर निघालेल्या सरपंच आरक्षण सोडती मध्ये गावचे आरक्षण सर्वसाधारण महिला निघाले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रुबाब कल्याणी यांच्या आशिष पोतदार आणि सीता सुधाकर गाडे या 2 सदस्यांनी पाठिंबा दिल्यामुळे सरपंच निवडीवेळी अश्विनी घाडगे यांनी 7 मतांसह सरपंचपद पटकावले. तर उपसरपंचपदी आशिष प्रभाकर पोतदार यांची निवड झाली. निवडीनंतर सौ. अश्विनी घाडगे आणि जोतिराम घाडगे यांच्या मूळ गावी वाखरी येथेही आनंद व्यक्त होत आहे. नूतन सरपंच अश्विनी घाडगे आणि जोतिराम घाडगे यांचे वाखरी ग्रामस्थांतून अभिनंदन होत आहे.