भाजपने खोटे आकडे देऊन जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा पराभव मान्य करावा : बाळासाहेब थोरात
*राज्यातील ४ हजारांहून अधिक ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडाः बाळासाहेब थोरात*
*८० टक्के ग्रामपंचायतीत महाराष्ट्र विकास आघाडी विजयी*
मुंबई, दि. १८ जानेवारी २०२१-
राज्यात पार पडलेल्या १४ हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले असून राज्यातील चार हजारांहून अधिक ग्रामपंचायतीत काँग्रेस पक्षाने बहुमताने विजय मिळवला आहे. राज्याच्या सर्व भागातील ग्रामपंचायतीत महाराष्ट्र विकास आघाडीने ८० टक्के जागा मिळवून प्रचंड मोठा विजय मिळविला आहे. या निकालातून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या एक वर्षाच्या कामावर जनतेने विश्वास दाखवला आहे. राज्यात भाजपचा दारूण पराभव झाला असून भाजप नेत्यांनी खोटे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करण्याऐवजी खुल्या दिलाने पराभव मान्य करावा असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर जनतेचा मोठा विश्वास असून आजच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाने यावर शिक्कामोर्तब केले आहे. कोल्हापूर, नंदूरबार, लातूर, नांदेड, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, उस्मानाबाद, वाशीम, बुलढाणा या जिल्ह्यांत आतापर्यंतच्या निकालावरून काँग्रेस क्रमांक १ चा पक्ष म्हणून समोर आला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकी प्रमाणेच जनतेने या निवडणुकीतही भाजपचा दारूण पराभव करत महाराष्ट्र विकास आघाडीला कौल देत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाच्या उमेदवारांवर विश्वास दाखविलेला आहे. विदर्भात काँग्रेस पक्षाला प्रचंड मोठे यश मिळाले असून ५० टक्क्यांहून अधिक ग्रामपंचायतीत काँग्रेसचा विजय झाला आहे. विदर्भातील जनतेने काँग्रेसच्या पारड्यात निर्विवाद यश टाकले आहे. मराठवाड्यात काँग्रेसच्या जागा आणि मतांचाही टक्का वाढला, येथेही काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष म्हणून समोर येईल असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.
आजच्या निकालातून राज्यभर भाजपची झालेली पीछेहाट हे भाजपच्या धोरणांचे अपयश आहे. भाजपच्या अनेक नेत्यांना आपले गावही राखता आलेले नाही. भाजप नेत्यांनी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे खोटी आकडेवारी जाहीर करून आपलाचं पक्ष सर्वात मोठा असल्याचा खोटा दावा या निवडणुकीच्या निकालानंतरही केला आहे. त्यांनी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी खुल्या दिलाने पराभव स्वीकारावा. ग्रामपंचायत निवडणुकीत यशस्वी झालेल्या उमेदवारांचे व महाराष्ट्र विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून व मतदारांचे आभार व्यक्त करत महाराष्ट्र विकास आघाडीची ही विजयी घोडदौड या पुढेही अशीच कायम राहील असे थोरात म्हणाले.