प्रवासी महासंघाच्या राज्यातील 26 जिल्ह्यांच्या निवडी जाहीर ; सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी पांडुरंग बापट
पंढरपूर :- महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ ही संघटना प्रवाशी ग्राहकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी 1989 पासून राज्यात कार्यरत आहे. या संघटनेच्या माध्यमातून प्रवासी ग्राहकांचे प्रबोधन करण्याबरोबरच समस्यांचे निराकारणही केले जाते. संघटनेची राज्यव्यापी ऑनलाईन बैठक नुकतीच संपन्न झाली. प्रवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहा विभागातील एकूण 26 जिल्ह्यांच्या अध्यक्ष आणि संघटक पदांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी बैठकीत सोलापूर जिल्हा प्रवासी महासंघाच्या अध्यक्षपदी पांडूरंग बापट तर जिल्हा संघटक पदी गणेश वाजगे यांची निवड करण्यात आली.
या बैठकीस प्रवासी महासंघाचे राज्याध्यक्ष रणजित श्रीगोड, ग्राहक पंचायतीचे राज्याध्यक्ष डॉ. विजय लाड उपस्थित होते. या वेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र आणि महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ या दोन्ही संघटना ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांनी स्थापन केलेल्या असून त्या दोन्ही सहयोगी संघटना असल्याचे डॉ. विजय लाड यांनी सांगितले.
सामाजिक विधायक कामात महिलांचा सहभाग कसा वाढला पाहिजे याबाबत ग्राहक पंचायत सह संघटिका मेघाताई कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रवासी महासंघाची कार्य पद्धती ही, समन्वयातून संवाद आणि संवादातून ग्राहक कल्याण ही पद्धती असून साधकांनी आपली कार्य पद्धती अवलंबली पाहिजे याबाबत प्रवासी महासंघाचे उपाध्यक्ष अरुण वाघमारे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत सागर रणदिवे यांनी केले तर प्रास्ताविक आणि सूत्र संचालन राज्याचे सचिव प्रा. गुरुनाथ बहिरट यांनी केले. आभार प्रदर्शन विनोद बापट यांनी केले.