महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन
सोलापूर– महाराष्ट्राचे शिल्पकार व पहिले मुख्यमंत्री कै.यशवंतरावजी चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त सात रस्ता येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर शोभाताई बनशेट्टी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तसेच कौन्सिल हॉल समोरील यशवंतरावजी चव्हाण यांच्या पुतळ्यास व सोलापूर महानगरपालिकेच्या कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस महापौर शोभाताई बनशेट्टी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी माजी आमदार प्रकाश यलगुलवार,नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, जनसंपर्क अधिकारी विजयकुमार कांबळे,शशीकांत जिडेल्लू,गणेश डोंगरे,मलिकार्जुन हुणजे,गजानन केगणाळकर,अशोक खडके, नागनाथ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
खा.डॉ. जयसिद्धेश्वर महस्वामीजींची पर्यटन समिती सल्लागारपदी नियुक्ती
सोलापूर – केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य आणि पर्यटन खात्याच्या सल्लागार समितीच्या सदस्यपदी सोलापूरचे खासदार डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीमुळे सोलापूर जिल्ह्याला मोठा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्र राज्यातून चार खासदारांची निवड असून सोलापूरचे खा.डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, डॉ. अमोल कोल्हे, रक्षा खडसे, श्रीरंग बारणे यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या एकूण 26 जणांच्या सल्लागार समितीच्या सदस्यपदी खा.डॉ.जयसिध्देश्वर महाराज यांचा समावेश झाल्याने सोलापूर जिल्ह्यासाठी आनंदाची बाब आहे. सोलापूर जिल्हा पर्यटनाचा आगार असल्याने अनेक गोष्टी सोलापूरला आणण्यासाठी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर झालेली हि निवड म्हणजे सोलरच्या विकासाला चालना देणारी आहे.
श्री खंडोबा देवस्थान यात्रेस बुधवारपासून प्रारंभ
सोलापूर– सालाबादप्रमाणे यंदाही बाळे येथील श्री खंडोबा देवाची यात्रा मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा बुधवार 27 रोजी घटस्थापनेपासून सुरू होत असून चंपाषष्टी व पुढील तीन रविवार येथे मोठी गर्दी असते.लाखो भाविक महाराष्ट्र ,कर्नाटक व आंध्र या तीन राज्यातून दर्शनासाठी येत असतात. या कालावधीत पहाटे पाच वाजून 30 मिनिटांनी श्रीं ची काकड आरती, सकाळी ठीक आठ वाजता व रात्री सात वाजता दोन वेळा महापूजा व अभिषेक करण्यात येतात. तसेच दिवसभर जागरण गोंधळ, वाघ्या मुरळी नाचणे, तळी भंडारा उचलणे, वारू सोडणे, नवस फेडणे व जावळ काढणे इत्यादी धार्मिक कार्यक्रम होत असतात. तसेच रात्री आठ वाजता श्री खंडोबा देवाची पालखी घोडा व विद्युत रोषणाईने सोलापूर येथून आलेले मानाचे नंदीध्वजांची मिरवणूक पार पडते. धार्मिक लंगर तोडणे विधी पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते व तिसर्या रविवारी रात्री आठ वाजता शोभेचे दारूची रोषणाई केली जाणार आहे. मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविक व यात्रेकरूंच्या दर्शनाची सोय करण्यात आली आहे. येि चोख पोलिस बंदोबस्त ही ठेवण्यात येत आहे. सोलापूर महानगरपालिकेकडून सिटी बस सेवा, पाण्याची सोय करण्यात आली आहे.
संविधान दिनी विद्यापीठात प्रास्ताविकेचे उद्घाटन
सोलापूर– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019 रोजी भारतीय संविधान दिनी ’संविधान प्रास्ताविके’चे उद्घाटन होणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी दिली.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते हा कार्यक्रम विद्यापीठ प्रांगणात होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या राहणार आहेत.
विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ भारतीय संविधानाची प्रास्ताविका उभारण्यात आली आहे. या प्रास्ताविकेचे उद्घाटन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते येत्या मंगळवारी, 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. उद्घाटनानंतर विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात कार्यक्रम होणार आहे. यावेळी संविधान प्रास्ताविकेचे वाचन होणार आहे. त्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांचे मार्गदर्शन होणार आहे. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य व शिक्षण प्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. घुटे यांनी केले आहे.