राष्ट्रवादीत पक्षाअंतर्गत संघर्ष..अन् रस्त्यावर परिवर्तनाचा निर्धार
राज्याची सत्ता हाती घेण्याबरोबरच देशाच्या राजकारणात ही महत्वपूर्ण भूमिका पार पाडण्यासाठी जास्तीत लोकसभा व विधानसभा जागा जिंकण्याचा चंग बांधलेल्या राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाला अंतर्गत संघर्षाला सामोरे जावे लागत आहे. एका बाजूला पक्षाध्यक्ष शरद पवार हे गटबाजी संपविण्यासाठी मतदारसंघ निहाय दौरे करीत आहेत तर दुसरीकडे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे रस्त्यावर उतरून सत्ता परिवर्तनचा निर्धार व्यक्त करीत आहेत.
राष्ट्रवादी काँगे्रस पक्षात सारेच दिग्गज नेते असल्याने येथे गटबाजी ही नित्याची बनली आहे. नुकतीच कोल्हापूर मध्ये परिवर्तन निर्धार यात्रा गेली होती तेंव्हा सार्यांनीच कागलमध्ये जे घडले ते पाहिले आहे. खासदार धनंजय महाडिक हे तेथे भाषणाला उभे राहिले आणि त्यांनी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव न घेतल्याने सभेला आलेल्या मुश्रीफ समर्थकांनी अक्षरशः असा गोंधळ घातला की महाडिक यांना भाषण सोडून बसावे लागले. यानंतर मुश्रीफ यांनी समर्थकांना शांत केले व महाडिक यांना भाषणासाठी आग्रह करून उभे केले. हे सार्या महाराष्ट्राने पाहिले. यावेळी व्यासपीठावर अजित पवार देखील उपस्थित होते. कोल्हापूरच्या राजकारणात मुश्रीफ आणि महाडिक यांच्यातील राजकीय स्पर्धा सारेच जाणतात.
यापूर्वीच दोन दिवस अगोदर पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे सातार्यात गेले होते. तेथील पक्षाचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले व शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील राजकीय संघर्ष सार्यांनाच ठाऊक आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पवार यांनी दोन्ही गटांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सातार्यात पवार यांनी छत्रपती उदयनराजे व शिवेंद्रराजे यांना एकाच गाडीत बसविले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 2014 मध्ये ज्या लोकसभेच्या चार जागा राज्यात जिंकल्या यात शरद पवार यांच्या बारामतीसह कोल्हापूर, सातारा व माढ्याच्या जागेचा समावेश होता. बारामतीमध्ये पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे विजयी झाल्या होत्या. तर कोल्हापूरमध्ये धनंजय महाडिक, सातार्यात छत्रपती उदयनराजे भोसले व माढ्यात विजयसिंह मोहिते पाटील यांचा समावेश होता. या तीन ही जागी विजयी झालेले उमेदवार हे ज्या त्या भागातील दिग्गज आहेत व त्यांची ताकद ही मोठी आहे. बाकी अन्यत्र राज्यात राष्ट्रवादीला एक ही लोकसभेची जागा त्यावेळी जिंकता आली नव्हती. आता ही 2019 च्या लोकसभा निवडणुका तोंडावर असताना कोल्हापूर असो की सातार्यात विविध गटातील मनोमिलनासाठी पवारांना प्रयत्न करावे लागत आहेत.
अशीच स्थिती माढा लोकसभा मतदारसंघात आहे. येथे तर पक्षाचे तिकिट जाहीर होण्यापूर्वीच सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी समर्थन मिळविण्यासाठी दौरे सुरू केले आहेत. यामुळे सहाजिकच विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील समर्थकांमध्ये संभ्रम असणारच. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाची ताकद मोठी असली तरी येथे गटबाजीचा कळस आहे. लोकसभेचे तिकिट मोहिते पाटील, प्रभाकर देशमुख व जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी मागितले आहे. राष्ट्रवादी अंतर्गत असणार्या मतभेदांचे अनेकदा दर्शन घडले आहे. यंदाच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा इतिहास तर सार्यांनाच माहित आहे. अशा स्थितीत आज अजित पवार यांच्यासह पक्षाचे नेते परिवर्तन निर्धार यात्रा घेवून सोलापूर जिल्ह्यात आले आहेत.