‘एमआयटी’ ची मानवसेवा, पंढरीत कोविड रुग्णांच्या विलगीकरण व उपचारासाठी दिल्या इमारती
पंढरपूर,दिः 27 जूनः कोरोनाबाधित रुग्णांसाठी एमआयटी विश्वशांती गुरूकुल स्कूलने वाखरी येथील शाळेच्या दोन इमारती विलगीकरण व उपचार केंद्रासाठी पंढरपूर प्रशासनाला दिल्या आहेत. मानवसेवा हा मुख्य उद्देश ठेवून हे कार्य केले जात आहे. अशी माहिती माईर्स एमआयटी, पुणे व विश्वशांती गुरूकुलाच्या कार्यकारी संचालिका प्रा. स्वाती कराड-चाटे यांनी दिली.
संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस कोविड-19 चा प्रार्दुभाव महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात दिसून येतो. अशावेळेस राज्यातील जनतेचे आराध्य दैवताचे श्रीक्षेत्र पंढरपूर येथेही या व्हायरसमुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतांना दिसत आहे. येथे उपलब्ध वैद्यकीय सेवा व विलगीकरण केंद्रांची अपुरी सुविधा, रुग्णांचे होणारे हाल या सर्व गोष्टी लक्षात घेऊन माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या मार्गदर्शनातून प्रा. स्वाती कराड चाटे यांनी वाखरी येथील 24 एकर क्षेत्रामध्ये विस्तारीत गुरूकुल स्कूलमधील एक इमारात कोविड-19 रुग्णांसाठी दिली आहे.
एकीकडे पंढरपूर येथे शासनाने नियोजित केलेल्या ठिकाणांना असणारा काहींचा विरोध लक्षता घेता एमआयटी विश्वशांती गुरूकुल स्कूलने केलेली मदत ही पंढरपूर व परिसरातील जनतेला दिलासा देणारी आहे.
गेल्या चार दशकांपासून शैक्षणिक, सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत पुणे येथील माईर्स एमआयटी शिक्षण संस्था संपूर्ण देशभरात विस्तारित आहे. माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या नेतृत्वाखाली आळंदी, देहू, पंढरपूर येथे ही संस्था वारकर्यांसाठी कार्य करीत आहे. सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून त्यांनी आळंदी व देहू येथे घाटांची उभारणी व इतर अनेक बांधकामे करून लाखो वारकर्यांसाठी सुखसोई निर्माण केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे वाखरी येथे संपूर्ण महाराष्ट्रातून येणार्या लाखो वारकर्यांसाठी मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जाते. या वारकर्यांसाठी येथे अन्नदान केले जाते. त्याच प्रमाणे राज्य प्रथमच वारकर्यांसाठी कुस्ती स्पर्धा भरविल्या जातात. या स्पर्धेत लहान गटापासून ते वृद्धापर्यंत स्पर्धा होतात. असा प्रकारचे अनेक समाजउपयोगी उपक्रम डॉ. कराड हे अनेक वर्षापासून राबवित आहेत. वाखरी तळावर ही संस्था सुरू होण्यापूर्वी डॉ. कराड यांनी वृक्षारोपण केले आहे.
यापुढेही भविष्यात येणार्या सर्व परिस्थितीशी सामना करण्यासाठी आमची संस्था ही शासनास मदत करण्यास सैदव तत्पर असेल, असेही प्रा. स्वाती कराड-चाटे यांनी सांगितले.