माढा-सोलापूरसह 18 जागा संभाजी ब्रिगेड लढणार
मतदारांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रातील 18 लोकसभेच्या जागा लढविणार असल्याची घोषणा पक्षाचे पुणे विभागीय अध्यक्ष किरण घाडगे यांनी पत्रकार परिषदे मध्ये केली. माढ्यामधून विश्वंभर काशीद व सोलापूरमधून पंंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत मस्के हे उमेदवार असणार आहेत.
पंढरपूर पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेस संभाजी ब्रिगेडचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, मराठा सेवा संघाचे विश्वंभर काशीद, सोलापूर शहराध्यक्ष भाऊसाहेब रोडगे, नितीन खटके, पंढरपूर तालुकाध्यक्ष बाळासाहेब बागल, समाधान क्षीरसागर, हनुमंत साळुंखे, दादासाहेब बोडके, संदीप फडतरे होते.
देशातील मोदी सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. याउलट नोटाबंदी, जीएसटी या सारख्या निर्णयामुळे देश आर्थिक संकटात लोटला आहे. रोजगार निर्मिती ऐवजी बेरोजगार अधिक वाढले असा आरोप घाडगे यांनी केला. यामुळे संभाजी ब्रिगेड पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. काँग्रेससह राष्ट्रवादीने देखील विरोधीपक्ष म्हणून निराशा केली असल्याने त्यांच्या विरोधात आघाडी काढली असल्याचे सांगितले.
मागील पाच वर्षात माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा विकास झालेला नाही . सोलापूर लोकसभेचे खासदार हे सत्ताधारी पक्षातील असून ही त्यांनी मतदारसंघाकडे पाठ फिरवली. त्यांच्या बद्दल पक्षातूनच नाराजी असल्याने एका महाराजांना आता भाजपा उमेदवारी देत असल्याची टीका घाडगे यांनी केली. भाजपाने शेतकरी, मराठा आंदोलक, धनगर आरक्षण प्रश्नी फसवणूक केली आहे. यामुळे त्यांच्या विरोधात पुणे, औरंगाबाद, सोलापूर, बुलढाणा आदी जिल्ह्यात उमेदवार देणार असल्याचे त्यांनी सांगितले.